आयसीसी क्रमवारीत अश्विन, जडेजाने केली 42 वर्षे जुन्या विक्रमाची पुनरावृत्ती
By admin | Published: December 21, 2016 10:47 PM2016-12-21T22:47:16+5:302016-12-21T22:47:16+5:30
काल आटोपलेल्या इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीत दुसऱ्या डावात भारताला ऐतिहासिक विजय मिळवून देणाऱ्या रवींद्र जडेजाने आता अजून एक कारनामा केला आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 21 - काल आटोपलेल्या इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीत दुसऱ्या डावात भारताला ऐतिहासिक विजय मिळवून देणाऱ्या रवींद्र जडेजाने आता अजून एक कारनामा केला आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील दमदार कामगिरीच्या जोरावर जडेजाने आज जाहीर झालेल्या आयसीसी क्रमवारीतील कसोटी गोलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहेत. त्याबरोबरच कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीतील पहिल्या दोन क्रमांकांवर आता भारतीय गोलंदाजांचा कब्जा झाला आहे. या यादीत भारताचा अव्वल फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याआधीपासूनच अव्वलस्थानावर आहे. विशेष बाब म्हणजे अश्विन आणि जडेजाने कसोटी क्रमवारीतील गोलंदाजांच्या पहिल्या दोन स्थानांवर कब्जा करत बेदी आणि चंद्रशेखर यांच्या पराक्रमाशी बरोबरी साधली आहे. 1974 साली बिशन बेदी आणि भागवत चंद्रशेखर यांनी कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या दोन स्थानांवर कब्जा केला होता.
चेन्नईत झालेल्या पाचव्या कसोटी सामन्यात जडेजाने पहिल्या डावात तीन आणि दुसऱ्या डावात सात असे मिळून दहा बळी मिळवले होते. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील दमदार कामगिरीच्या जोरावर जडेजाने 66 गुणांची कमाई केली आहे. त्या जोरावर त्याने जोश हेझलवूड, जेम्स अॅडरसन, डेल स्टेन आणि रंगना हेराथ अशा गोलंदाजांना मागे टाकत दुसरे स्थान पटकावले आहे.