रविकुमार, सांगवान डोपिंगमध्ये दोषी; दोघांचे निलंबन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2019 03:52 AM2019-12-12T03:52:11+5:302019-12-12T03:57:44+5:30
२९ वर्षांच्या रविकुमारने नेमबाजी विश्वचषक आणि राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्य जिंकले होते.
नवी दिल्ली : टोकियो ऑलिम्पिक सुरू होण्यासाठी अवघे काही महिने उरले असताना भारतालाही डोपिंगचा फटका बसला. नेमबाज रविकुमार व बॉक्सर सुमित सांगवान हे उत्तेजक द्रव्यसेवन चाचणीत (डोपिंग) दोषी आढळले. त्यांच्यावर ‘वाडा’कडून (विश्व अँटी डोपिंग एजन्सी) निलंबनाची कारवाई करण्यात आली.
२९ वर्षांच्या रविकुमारने नेमबाजी विश्वचषक आणि राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्य जिंकले होते. डोपिंग चाचणीचे निकाल आल्यानंतर त्याच्या निलंबनाचे आदेश देण्यात आले. बॉक्सर सुमित सांगवान याच्यावरही निलंबनाची कारवाई करण्यात आली. २६ वर्षांच्या सांगवानने २०१७ च्या आशियाई चॅम्पियनशिपमध्ये रौप्य जिंकले होते. प्रतिबंधित एसिटाजोलमाईड या द्रव्याचे त्याने सेवन केल्याचे चाचणीत निष्पन्न झाले. त्यामुळे त्याला टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये सहभागी होता येणार नाही.
रविकुमार आणि सुमित सांगवान हे दोघेही आता भारताच्या ऑलिम्पिक पथकाचे सदस्य राहणार नाहीत. दरम्यान, सोमवारी वाडाने डोपिंगच्या आरोपाखाली रशियावर चार वर्षांसाठी बंदी घातली. पुढील चार वर्षे रशियाचा कोणताही खेळाडू देशाच्या ध्वजाखाली ऑलिम्पिकमध्ये भाग घेऊ शकणार नाही. रशियाच्या खेळाडूंबाबत डोपिंगची अनेक प्रकरणे उघडकीस आली होती. त्यांच्यावर अनेक आरोप झाले. पुढची चार वर्षे रशियाचा ध्वज, राष्ट्रगीत आणि संघाचे नाव ऑलिम्पिकमध्ये कुठेही पाहायला किंवा ऐकायला मिळणार नाही.
‘चूक झाली’, शिक्षा कमी होईल - रविकुमार
डोप चाचणीत अपयशी ठरलेला २९ वर्षांचा नेमबाज रविकुमार याने माझ्याकडून बेसावधपणे चूक झाल्याची कबुली देत राष्टÑीय डोपिंग एजन्सीकडून शिक्षा कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. तो म्हणाला, ‘मायग्रेनचा त्रास कमी व्हावा म्हणून मी हे औषध सेवन केले होते. मे महिन्यात एका स्पर्धेदरम्यान राहत्याघरी डॉक्टरने हे औषध दिले. मी नाडाला कबुली दिली आहे.’ रवीने चूक मान्य केल्यामुळे आता त्याच्या ब नमुन्याचे परीक्षण होणार नाही. याप्रकरणी दोन वर्षांच्या शिक्षेची तरतूद असून ही शिक्षा कमी होईल, अशी त्याला अपेक्षा आहे.