रवींद्र जडेजाची द्वितीय स्थानी झेप, आश्विनचे अव्वलस्थान कायम
By admin | Published: December 22, 2016 12:29 AM2016-12-22T00:29:45+5:302016-12-22T00:34:04+5:30
भारताचे दोन गोलंदाज रविचंद्रन आश्विन आणि रवींद्र जडेजा हे आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल दोन स्थानावर आले आहेत.
दुबई : भारताचे दोन गोलंदाज रविचंद्रन आश्विन आणि रवींद्र जडेजा हे आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल दोन स्थानावर आले आहेत. त्यात डावखुरा रवींद्र जडेजाने इंग्लंडविरुद्ध चेन्नई कसोटीत प्रथमच एकूण १० बळी घेत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. जडेजाला या कामगिरीने ६६ गुण मिळाले आहेत. त्यामुळे तो अव्वलस्थानी कायम असणाऱ्या आॅफस्पिनर आश्विनपासून फक्त आठ गुणांनी दूर आहे.
भारतीय दोन गोलंदाज गोलंदाजी क्रमवारीत असण्याची ही दुसरीच वेळ आहे. याआधी डावखुरा फिरकी गोलंदाज बिशनसिंह बेदी आणि लेगस्पिनर बी. चंद्रशेखर हे १९७४ मध्ये पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर होते.
पाचव्या कसोटीत एकूण १५४ धावांत १0 बळी घेणाऱ्या जडेजाने पाच सामन्यांच्या मालिकेत २६ गडी बाद केले आहेत, तर आश्विने २८ विकेट आपल्या नावावर केल्या आहेत. या कामगिरीमुळे भारताने इंग्लंडविरुद्ध ४-0 अशी कसोटी मालिका जिंकली. या कामगिरीमुळे जडेजाने जोश हेजलवूड, जेम्स अँडरसन, डेल स्टेन आणि रंगना हेराथ यांना मागे टाकले आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीतही जडेजा तिसऱ्या, तर आश्विन अव्वल स्थानावर आहे. दरम्यान, भारतीय वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा २३व्या स्थानावर पोहोचला आहे.
कसोटी फलंदाजांच्या यादीत भारताचा लोकेश राहुल आणि करुण नायर यांना मोठा फायदा झाला आहे. १९९ धावांच्या खेळीमुळे राहुलला २९ स्थानांचा लाभ होऊन तो कारकिर्दीतील सर्वोत्तम अशा ५१ व्या रँकिंगवर पोहोचला आहे, तर नायरला त्याच्या तिसऱ्या कसोटीतील ३0३ धावांच्या खेळी १२२ स्थानांचा लाभ होऊन तो ५५ व्या स्थानी पोहोचला.
मंगळवारी भारतीय संघाने इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका जिंकून वर्षाची अखेर नंबर वन स्थानाने केली आहे. या मालिकेतील विजयाने भारताला पाच स्थानांचा फायदा झाला आहे आणि आता ते २0१६ च्या अंतिम कसोटी रँकिंग अपडेटमध्ये टीम १२0 गुणांवर पोहोचले आहेत. भारत दुसऱ्या स्थानावर असणाऱ्या आॅस्ट्रेलियापेक्षा १५ गुणांनी पुढे आहे. (वृत्तसंस्था)
विदेशातील चोकर्सचा डाग पुुसायचाय : जडेजा
भारतीय क्रिकेट संघाच्या कामगिरीचा वर्षाअखेरीस शानदार समारोप करीत विदेशात भारतीय संघ कचखावू सिद्ध होतो, हा डाग आगामी २०१७ मध्ये पुसून काढण्याचा संकल्प अष्टपैलू रवींद्र जडेजा याने सोडला आहे.
चेन्नईत पाचव्या आणि अखेरच्या कसोटीत जडेजाने दुसऱ्या डावात ४८ धावा देत सात इंग्लिश फलंदाजांना बाद केले. एकापाठोपाठ एक मालिका जिंकल्यामुळे भारतीय संघासाठी मावळते वर्ष फारच चांगले राहिल्याचे जडेजा म्हणाला.
भारताने यंदा ११ कसोटी सामने खेळले आणि ८ जिंकले. या आधी २०१० मध्ये भारताने कॅलेंडर वर्षांत सर्वाधिक १४ सामने खेळले होते. त्यातील आठ जिंकले,तीन हरले आणि तीन सामने अनिर्णीत राहिले होते. संघातील खेळाडूंचा फिटनेस चांगला असल्यामुळेच यंदा आम्ही यशस्वी कामगिरी करू शकलो. आमचे खेळाडू फिट असून, मैदान आणि जीममध्ये बराच वेळ घालवीत असल्याचा हा परिणाम आहे, असे त्याने आवर्जून सांगितले.
मी आणि माझा संघ जगभरात पसरलेल्या आमच्या चाहत्यांना शब्द देतो की, ‘विदेशात खराब कामगिरी करणारा संघ हा ‘टॅग’ पुसून काढू.
- रवींद्र जडेजा