आंतरराष्ट्रीय स्तरावर रविनाचे सुवर्ण यश, स्वसंरक्षणाच्या विचारातून निर्माण झाली आवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 03:04 AM2017-09-22T03:04:52+5:302017-09-22T03:04:55+5:30
सध्याच्या काळात महिलांनी स्वसंरक्षणाकरिता दुस-यावर अवलंबून राहण्यापेक्षा त्याकरिता स्वत:च सिद्ध झाले पाहिजे, अशी भूमिका पेणमधील कारमेल हायस्कूलमध्ये इयत्ता नववीत शिकणा-या रविना रवींद्र म्हात्रे हिची आहे.
प्रदीप मोकल
वडखळ/पेण : सध्याच्या काळात महिलांनी स्वसंरक्षणाकरिता दुस-यावर अवलंबून राहण्यापेक्षा त्याकरिता स्वत:च सिद्ध झाले पाहिजे, अशी भूमिका पेणमधील कारमेल हायस्कूलमध्ये इयत्ता नववीत शिकणा-या रविना रवींद्र म्हात्रे हिची आहे. त्याकरिता तिने पाचवीपासून स्वसंरक्षणाच्या विचारातूनच कराटे या खेळाची निवड केली आणि पुढे याच खेळाची तिला आवड निर्माण झाली. अथक मेहनतीने रविनाने इंटरनॅशनल चॅम्पियनशिपमध्ये यश संपादन करून सिल्व्हर, गोल्ड पदके जिंकू नरायगडचे नाव उंचावले आहे.
सातत्यपूर्ण सरावातून रविनाने शालेय स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊन पारितोषिके मिळविली आहेत, परंतु मे २०१७ मध्ये काठमांडू (नेपाळ) येथे झालेल्या इंटरनॅशनल कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेकरिता तिची निवड झाली. तिने या स्पर्धेत एक सिल्व्हर, दोन ब्रांझ मेडल्स मिळवून यश संपादन केले आहे. गतवर्षी जानेवारी २०१६ मध्ये तामिळनाडूमध्ये झालेल्या ‘नॅशनल थांग-ता चॅम्पियनशिप’ मध्ये तिने प्रत्येकी एक सिल्व्हर आणि गोल्ड मेडल संपादन करून आपल्या यशाची चढती कमान अबाधित राखली
आहे.
रविना रवींद्र म्हात्रे हिने आपल्या कराटे क्रीडा नैपुण्यातून प्राप्त केलेल्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील यशातून एक नवा वस्तुपाठ महिलांच्या समोर ठेवला आहे. आज महिलांच्या छेडछाडीचे, अत्याचारांचे प्रमाण वाढत आहे, तेव्हा स्त्री स्वयंपूर्ण होण्याकरिता स्वसंरक्षण अत्यावश्यक असून त्याकरिता रविनाप्रमाणे भूमिका स्वीकारून कराटेमधील कसब स्वीकारण्याचा मनोदय महिलांनी विशेष: विद्यार्थिनी वा युवतींनी या नवरात्रोत्सवात केल्यास, यंदाचा नवरात्रोत्सव त्यांच्याकरिता संस्मरणीय ठरू शकेल.
>रविना म्हात्रेवर होतोय कौतुकाचा वर्षाव
मे २०१४ मध्ये रविनाने नॅशनल कराटे चॅम्पियनशिपमध्ये एक सिल्व्हर आणि गोल्ड मेडल, तर दिल्लीमध्ये झालेल्या नॅशनल युनिफाईट कराटे स्पर्धेत दोन गोल्ड मेडल्स मिळविली आहेत.
मे २०१२ मध्ये नेपाळ येथे झालेल्या कराटे इंटरनॅशनल चॅम्पियनशिपमध्ये दोन सिल्व्हर तर मे २०११ मध्ये चंदिगड येथे झालेल्या कराटे नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये दोन गोल्ड पदके संपादन केली आहेत.
सर्वप्रथम मे २००८ मध्ये तिने दिल्लीत झालेल्या आॅल स्टाईल ओपन कराटे नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये दोन सिल्व्हर मेडल्स संपादन केली आहेत. रविनाच्या या यशामुळे तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.