आरसीबी आणि २३ एप्रिलचा अजब योगायोग
By Admin | Published: April 24, 2017 01:50 AM2017-04-24T01:50:27+5:302017-04-24T15:58:24+5:30
क्रिकेटला महान अनिश्चिततेचा खेळ का म्हटले जाते याचा प्रत्यय क्रिकेटप्रेमींना रविवारी पुन्हा एकदा आला. सध्याच्या अव्वल क्रिकेटपटूंपैकी एक असलेल्या विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला
style="text-align: justify;">बाळकृष्ण परब/ ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २४ - क्रिकेटला महान अनिश्चिततेचा खेळ का म्हटले जाते याचा प्रत्यय क्रिकेटप्रेमींना रविवारी पुन्हा एकदा आला. सध्याच्या अव्वल क्रिकेटपटूंपैकी एक असलेल्या विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला आयपीएलमधील सर्वात लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. त्याबरोबरच जुळून आला एक अजब आणि विचित्र योगायोग. आयपीएलच्या इतिहासातील सर्वोच्च आणि निचांकी अशा दोन्ही धावसंख्याचे विक्रम आरसीबीच्या नावावर नोंदवले गेले आहेत. विचित्र बाब म्हणजे हे दोन्ही विक्रम एकाच दिवशी म्हणजे २३ एप्रिलला नोंदवले गेले आहेत.
बरोबर चार वर्षांपूर्वी २३ एप्रिल २०१३ दिवशी ख्रिस गेलच्या तुफानाने आयपीएल आणि ट्वेंटी-२० क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक धावसंख्येचा विक्रम रचला होता. त्याच्या १७५ धावांच्या वादळी खेळीच्या जोरावर बंगळुरूने ५ बाद २६३ ही आयपीएलच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या रचली होती. आता चार वर्षांनी २३ एप्रिल याच दिवशी बंगळुरूच्या नावावर सर्वबाद ४९ हा आयपीएलमधील सर्वात निचांकी धावसंख्येचा विक्रम आरसीबीच्या नावावर नोंदवला गेलाय.
त्यानिमित्ताने एखाद्याशी क्रिकेट कसा क्रूर खेळ खेळू शकतो. यशोशिखरावर असलेल्याला पार सागरतळाला कसा पाठवू शकतो, हे आज इडन गार्डनवर दिसले. ऐतिहासिक इडन गार्डनवर कोलकात्याला १३१ धावांत गुंडाळल्यावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हा सामना सहज जिंकेल, असाच सर्वांचा होरा होता. पण प्रत्यक्षात मैदानावर जे काही घडले, त्याची कुणीही कल्पना केली नसेल.
अजून एक योगायोग म्हणजे आठ वर्षांपूर्वी २००९ साली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध खेळतानाच राजस्थान रॉयल्सवर सर्वबाद ५८ या आयपीएलमधील तेव्हाच्या निचांकी धावसंख्येवर गारद होण्याची नामुष्की ओढवली होती.
त्या सामन्यातले दोन खेळाडू आजही खेळले. ते म्हणजे विराट कोहली आणि रॉबिन उथप्पा. फरक एवढाच की त्या सामन्यात दोघेही एकाच संघात होते. तर आज एकमेकामविरुद्ध.
बंगळरुच्या दुर्दैवाने या योगायोगांची मालिका येथेच संपत नाही. आयपीएलमध्ये सर्वात प्रथम १०० हून कमी धावांत गारद होण्याची नामुष्की रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवरच ओढवली होती. त्यावेळीही कोलकाता नाइटरायडर्सचा संघच प्रतिस्पर्धी होता. १८ एप्रिल २००८ साली झालेल्या त्या सामन्यात आरसीबीचा संघ अवघ्या ८२ धावांत गारद झाला होता. आता आयपीएलमध्ये ५० हून कमी धावांत गारद होणारा पहिला संघ ठरण्याची नामुष्कीही आरसीबीवरच ओढवलीय. पुन्हा समोर प्रतिस्पर्धी कोलकाता नाइटरायडर्स.
एकंदरीत आजच्या पराभवाने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या आत्मविश्वासाला जबर धक्का पोहोचला असेल, त्यामुळे पुढच्या सामन्यापूर्वी त्यातून सावरणे आरसीबी आणि कर्णधार विराट कोहलीसाठी खूप कठीण जाणार आहे.