आरसीबीचे गोलंदाज दडपणाखाली
By admin | Published: May 7, 2016 04:45 AM2016-05-07T04:45:05+5:302016-05-07T04:45:05+5:30
आयपीएलच्या नवव्या पर्वात आरसीबीचा (रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू) संघ अडचणीच्या स्थितीत आहे, पण अद्याप आम्हाला संधी आहे. आतापर्यंतची आमची कामगिरी साधारण राहिली आहे.
एबी डिव्हिलियर्स लिहितो़...
आयपीएलच्या नवव्या पर्वात आरसीबीचा (रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू) संघ अडचणीच्या स्थितीत आहे, पण अद्याप आम्हाला संधी आहे. आतापर्यंतची आमची कामगिरी साधारण राहिली आहे. आम्हाला सातपैकी केवळ दोन लढतींमध्ये विजय मिळवता आला. प्ले आॅफमध्ये स्थान मिळवण्यासाठी आगामी सातपैकी सहा सामन्यांत विजय मिळवणे आवश्यक आहे, याची आम्हाला चांगली कल्पना आहे. ही अशक्य बाब नाही, हे मी तुम्हाला सांगू इच्छितो.
आयपीएलमध्ये यापूर्वीही आम्ही पराभवाचे दष्टचक्र भेदत सलग पाच-सहा सामने जिंकण्याची कामगिरी केली आहे. पहिले एक आणि त्यानंतर दुसरा याप्रमाणे लढतींवर लक्ष केंद्रित करावे लागेल. त्यामुळे आत्मविश्वास उंचावण्यास मदत मिळते. अशाच पद्धतीने एकापाठोपाठ सामने जिंकल्यानंतर लय गवसण्यास मदत मिळते आणि तुम्ही स्पर्धेत पुनरागमन करण्यात यशस्वी ठरता. अशा स्थितीत तुम्हाला कुठल्या प्रतिस्पर्ध्याचे भय वाटत नाही आणि प्रत्येक लढतीत वेगळ्या आत्मविश्वासाने सहभागी होता.
संघातील माहोल सकारात्मक आहे. आमच्या तंबूत कुठले भय नसून कुणीच एकमेकांवर दोषारोप करीत नाहीत. अशी परिस्थिती होण्यासाठी सर्वंच जबाबदार असल्याची आम्हाला कल्पना आहे. चाहत्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी अशा परिस्थितीतून मार्ग काढण्याची जबाबदारीही आमचीच आहे. आम्हाला कामगिरीत सातत्य राखता आले नाही. आम्ही काही वेळ चांगली कामगिरी केली, पण ४० षटके त्यात सातत्य राखण्यात अपयशी ठरलो. कोलकाताविरुद्धच्या लढतीत ३५ षटकापर्यंत आमचे नियंत्रण होते. आम्ही चांगली धावसंख्या उभारली आणि चांगली गोलंदाजीही केली, पण त्यानंतर आम्ही नियंत्रण गमावले आणि अखेरच्या १५ मिनिटांमध्ये सामनाही गमावला. आमची फलंदाजी चांगली आहे, पण गोलंदाजी दडपणाखाली आहे. काय चूक होत आहे, याची गोलंदाजांना कल्पना असून आव्हान म्हणून त्यांनी याचा स्वीकार केला आहे.
आगामी सामन्यांमध्ये परिस्थिती बदलण्यासाठी सज्ज आहोत. आमचे क्षेत्ररक्षणही साधारण ठरले आहे. या विभागात प्रत्येक धाव वाचवण्यावर भर देणे आवश्यक आहे. क्षेत्ररक्षण दर्जेदार असेल तर प्रतिस्पर्धी संघावर दडपण आणता येते. कठीण लक्ष्य गाठायचे आहे, याची आम्हाला कल्पना आहे. लक्ष्य साध्य करण्याची क्षमता असलेला संघ आमच्याकडे असून ते साध्य करण्याची पद्धतही आम्हाला ठावुक आहे. (टीसीएम)