आरसीबीला सनरायझर्सविरुद्ध हवी सकारात्मक सुरुवात

By admin | Published: April 12, 2016 03:46 AM2016-04-12T03:46:07+5:302016-04-12T03:46:07+5:30

गेल्या आठ सत्रांत जेतेपदाजवळ पोहोचूनही ट्रॉफीवर ताबा मिळविण्यात अपयशी ठरलेल्या विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला आयपीएलच्या

RCB needs a positive start against Sunrisers | आरसीबीला सनरायझर्सविरुद्ध हवी सकारात्मक सुरुवात

आरसीबीला सनरायझर्सविरुद्ध हवी सकारात्मक सुरुवात

Next

बंगळुरू : गेल्या आठ सत्रांत जेतेपदाजवळ पोहोचूनही ट्रॉफीवर ताबा मिळविण्यात अपयशी ठरलेल्या विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला आयपीएलच्या नवव्या सत्रात आज मंगळवारी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध विजयासह मोहीम सुरू करण्याचा विश्वास आहे.
आरसीबी संघ सुरुवातीपासून तगडा समजला जातो. पण २००८ च्या सुरुवातीच्या सत्रापासून आतापर्यंत हा संघ जेतेपद मिळवू शकला नाही. दरम्यान, २००९ आणि २०११ मध्ये अंतिम फेरीत धडक देऊनही उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. या फ्रॅन्चायझीचे माजी चेअरमन वादात अडकले. पण वाद मागे ठेवून जेतेपदापर्यंत झेप घेण्यास कोहलीच्या नेतृत्वात संघ सज्ज झाला आहे. कोहली स्वत: चांगल्या फॉर्ममध्ये आहे. कोहलीशिवाय फलंदाजीत ख्रिस गेल, एबी डिव्हिलियर्स आणि शेन वॉटसन हे कुठल्याही गोलंदाजांवर हावी होऊ शकतात.
वॉटसनला लिलावात सर्वाधिक साडेनऊ कोटी किंमत मिळाली होती. तो लौकिकाला साजेसा खेळ करण्यात कुठलीही कसर शिल्लक राखणार नाही. स्टुअर्ट बिन्नी आणि मनदीपसिंग हे युवा खेळाडू आहेत. वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कच्या अनुपस्थितीत गोलंदाजीत अ‍ॅडम मिल्ने आणि केन रिचर्डसन आहेत. सोबतीला हर्षल पटेल, श्रीनाथ अरविंद आणि वरुण अ‍ॅरॉन हेदेखील आहेत. आॅफस्पिनर सॅम्युअल बद्री याची मात्र संघाला उणीव जाणवेल. त्याची पोकळी भरून काढण्यास यजुवेंद्र चहल सज्ज आहे. चहलने २०१४ मध्ये १४ आणि २०१५ मध्ये १५ गडी बाद केले होते.
सनरायझर्स हैदराबादने २०१३ मध्ये पदार्पण केले, पण अपेक्षेनुसार कामगिरी केली नाही. पण नव्याने सुरुवात करण्यास हा संघदेखील सज्ज झाला.
संघात युवराजसिंग, कर्णधार डेव्हिड वॉर्नर, आशीष नेहरा हे अनुभवी खेळाडू आहेत. युवराजची सेवा या संघाला मिळू शकणार नाही, कारण तो जखमी आहे. इयान मॉर्गन, केन विल्यम्सन आणि ट्रेंट बोल्ट हेदेखील उपयुक्त खेळाडू आहेत. फिरकी माऱ्यासाठी कर्ण शर्मा, दीपक हुड्डा, टी. सुमन हे गोलंदाज, तर यष्टिरक्षक-फलंदाज नमन ओझा उपयुक्तयोगदान देऊ शकतो. सनरायझर्स संघ आरसीबीसारखा बलाढ्य वाटत नाही, पण ऐनवेळी निकालाचे पारडे फिरविणारे खेळाडू संघाकडे आहेत, हे विशेष.(वृत्तसंस्था)

उभय संघ यातून निवडणार
रॉयल चॅलेंजर्स बँगलोर : विराट कोहली (कर्णधार), शेन वॉटसन, ख्रिस गेल, एबी डिव्हिलर्स, मिचेल स्टार्क, डेव्हिड विस, श्रीनाथ अरविंद, स्टुअर्ट बिन्नी, वरुण अ‍ॅरॉन, केदार जाधव, मनदीपसिंग, मॅडम मिल्ने, सर्फराझ खान, ट्रॅव्हिस हेड, हर्षल पटेल, अबू नेचिम, सचिन बेबी, यजुवेंद्र चहल, सॅम्युअल बद्री, प्रवीण दुबे, इक्बाल अब्दुल्ला, विक्रमजित मलिक, अ‍ॅडम मिलन, परवेझ रसूल, लोकेश राहुल, विकास टोकस व केन रिचर्डसन.

सनरायझर्स हैदराबाद : शिखर धवन (कर्णधार), युवराजसिंग, आशिष नेहरा, डेव्हिड वॉर्नर, भुवनेश्वरकुमार, ट्रेंट बोल्ट, कर्ण शर्मा, इआॅन मॉर्गन, मुस्तफिझूर रहमान, आदित्य तरे, बरिंदर सरन, के. एल. राहुल, मोझेस हेन्रिक्स, परवेझ रसूल, केन विल्यमसन, नमन ओझा, अभिमन्यू मिथुन, आशिष रेड्डी, विपुल शर्मा, सिद्धार्थ कौल, रिकी भुई, बेन कटिंग, विनय शंकर, आशिष नेहरा व टी. सुमन

Web Title: RCB needs a positive start against Sunrisers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.