डिव्हिलिअर्सच्या सल्ल्यामुळे आरसीबी आयपीएलबाहेर !
By Admin | Published: May 2, 2017 05:36 PM2017-05-02T17:36:10+5:302017-05-02T17:36:10+5:30
मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा सोमवारी झालेल्या सामन्यात 5 विकेटने पराभव करत बंगळुरूला आयपीएलमधील आपला गाशा गुंडाळायला भाग पाडलं.
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 2 - मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा सोमवारी झालेल्या सामन्यात 5 विकेटने पराभव करत बंगळुरूला आयपीएलमधील आपला गाशा गुंडाळायला भाग पाडलं. यासोबतच आयपीएलच्या 10व्या सत्रातून बाहेर पडणारा आयपीएल पहिला संघ ठरला.
आरसीबीच्या पराभवामध्ये टर्निंग पॉइंट ठरलं 18 वं षटक. या षटकापर्यंत आरसीबीने सामन्यावर पकड मिळवली होती. मात्र, याच षटकात ए.बी. डिव्हिलिअर्सने दिलेल्या एका सल्ल्यामुळे बंगळुरूला पराभवाचा सामना करावा लागला.
बंगळुरूचा गोलंदाज अनिकेत चौधरीने याबाबतचा खुलासा सामना संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत केला. डिव्हिलिअर्सने मला बाउन्सर टाकण्यास सांगितलं आणि त्यावर हार्दिक पांड्याने षटकार ठोकला आणि सामना मुंबईकडे झुकला, असं तो म्हणाला.
या सामन्यात एका वेळेस मुंबईला 13 चेंडूत 24 धावांची गरज होती, 18 व्या षटकाची सुरूवात अनिकेतने चांगली केली होती. पहिल्या 5 चेंडुंमध्ये त्याने बंगळुरूच्या खेळाडुंना एकही मोठा फटका खेळू दिला नाही. शेवटचा चेंडू टाकण्याआधी त्याने एबी डिव्हिलिअर्सकडे शेवटचा चेंडू कसा टाकावा याबाबत सल्ला मागितला. त्यावर डिव्हिलिअर्सने अनिकेतला बाउन्सर टाकण्यास सांगितलं कारण त्याआधीचे पाचही चेंडू त्याने धिम्यागतीने टाकले होते.
मैदानावर मुंबईचा कर्णधार रोहीत शर्मा आणि दमदार फॉर्मात असलेला हार्दिक पांड्या होते. पांड्याने अनिकेतने टाकलेल्या त्या बाउन्सरवर जोरदार प्रहार करत षटकार ठोकला आणि सामन्याचं पारडं फिरलं व बंगळुरूचा 5 विकेटने पराभव झाला.