सलग दुसऱ्या विजयास आरसीबी सज्ज
By admin | Published: April 13, 2015 03:30 AM2015-04-13T03:30:41+5:302015-04-13T03:30:41+5:30
सलामी लढतीत गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्सला पराभवाचा धक्का देणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाचा आत्मविश्वास उंचावला असून
बंगलोर : सलामी लढतीत गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्सला पराभवाचा धक्का देणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाचा आत्मविश्वास उंचावला असून सोमवारी त्यांना सनराईजर्स हैदराबाद संघाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. बेंगळुरू संघ गृहमैदानावर वर्चस्व गाजवण्यास उत्सुक आहे.
गेल व डिव्हिलियर्स या आक्रमक फलंदाजांच्या उपस्थितीनंतरही लौकिकाला साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरत असलेल्या विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील आरसीबी संघ पुढील तीन सामन्यांत गृहमैदानावर खेळण्याचा लाभ घेण्यास प्रयत्नशील आहे. केकेआरविरुद्ध ९६ धावांची खेळी करीत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणारा ख्रिस गेल गृहमैदानावर आक्रमक फलंदाजीचा नजराणा सादर करण्यास उत्सुक आहे. आरसीबी संघाचा फलंदाजी क्रम कुठल्याही प्रतिस्पर्धी संघावर दडपण निर्माण करण्यास सक्षम आहे. गेल, डिव्हिलियर्स आणि कोहली यांच्या उपस्थितीत आरसीबीची आघाडीची फळी कागदावर सर्वांत आक्रमक भासते. आयपीएल २०१५ च्या लिलावामध्ये १२ कोटी ५० लाख रुपयांमध्ये करारबद्ध झालेला यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक संघाचा समतोल साधण्यास सक्षम आहे. आॅस्ट्रेलियाचा मिशेल स्टार्क व न्यूझीलंडचा अॅडम मिल्ने यांच्या अनुपस्थितीत आरसीबीची गोलंदाजीची बाजू कमकुवत भासते. केकेआरविरुद्धच्या लढतीत सीन एबट सर्वांधिक महागडा ठरला. त्याने ३ षटकांत ३६ धावा बहाल केल्या. एबट व अॅरोन चमकदार कामगिरी करण्यास उत्सुक आहेत. आरसीबी संघात अशोक डिंडाचाही समावेश आहे, पण त्याला अंतिम ११ खेळाडूंत स्थान मिळते का, याबाबत उत्सुकता आहे. फिरकी गोलंदाजीची भिस्त यजुवेंद्र चाहलवर राहील. त्याने केकेआरविरुद्ध चार षटकांत २९ धावांच्या मोबदल्यात १ बळी घेतला होता. (वृत्तसंस्था)