आरसीबीचा धमाकेदार विजय

By admin | Published: April 13, 2016 03:07 AM2016-04-13T03:07:39+5:302016-04-13T03:07:39+5:30

कर्णधार विराट कोहली, धडाकेबाज एबी डिव्हीलियर्स आणि युवा सर्फराझ खान यांनी केलेल्या धमाकेदार फलंदाजीनंतर गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने

RCB's booming win | आरसीबीचा धमाकेदार विजय

आरसीबीचा धमाकेदार विजय

Next

बंगळुरू : कर्णधार विराट कोहली, धडाकेबाज एबी डिव्हीलियर्स आणि युवा सर्फराझ खान यांनी केलेल्या धमाकेदार फलंदाजीनंतर गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने आयपीएलमध्ये विजयी सलामी देत सनरायझर्स हैदराबादला ४५ धावांनी नमवले.
एन. चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बँगलोरने निर्धारित षटकांत ४ बाद २२७ धावांचा हिमालय उभारला. कोहली व एबीचे तडाखेबंद अर्धशतक आणि सर्फराझने दिलेला तडाखा यांमुळे हैदराबादची मजबूत धुलाई झाली. या अशक्यप्राय धावसंख्येचा पाठलाग करताना हैदराबादने २० षटकांत ६ बाद १८२ धावांची मजल मारली.
वेगवान सुरुवात केल्यानंतर दबावाखाली आलेल्या हैदराबादच्या धावसंख्येला ब्रेक लागला. सलामीवीर शिखर धवन केवळ ८ धावांवर बाद झाला, तर कर्णधार डेव्हिड वॉर्नरने आक्रमक अर्धशतक फटकावताना २५ चेंडंूत ४ चौकार ५ षटकारांसह ५८ धावा कुटल्या. वॉर्नर मैदानात असेपर्यंत बँगलोरच्या खेळाडूंवर दबाव होता. मात्र, परवेझ रसूलने वॉर्नरचा त्रिफळा उडवताना हैदराबादला मोठा धक्का दिला. यानंतर ठराविक अंतराने हैदराबादचे फलंदाज बाद होत राहिले. सर्वच प्रमुख फलंदाज दबावाखाली अपयशी ठरले. इआॅन मॉर्गन (नाबाद २२), आशिष रेड्डी (३२) आणि कर्ण शर्मा (नाबाद २६) यांनी थोडाफार प्रतिकार केला; परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. शेन वॉटसन आणि यजुवेंद्र चहल यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.
तत्पूर्वी, कोहली आणि एबी यांनी दुसऱ्या विकेटसाठी केलेल्या तडाखेबंद १५७ धावांच्या भागीदारीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादविरुद्ध २० षटकांत ४ बाद २२७ धावांचा डोंगर उभारला. कोहली आणि एबी यांनी तुफानी हल्ला चढवताना आक्रमक अर्धशतक झळकावून हैदराबादच्या गोलंदाजीची पिसे काढली; पण डाव गाजवला तो युवा फलंदाज सर्फराझ खानने. त्याने जोरदार फटकेबाजी करताना केवळ १० चेंडूंत नाबाद ३५ धावांचा तडाखा देऊन संघाला २००चा पल्ला गाठून दिला. ख्रिस गेल स्वस्तात बाद झाल्यानंतर कोहलीने ५१ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकार ठोकताना ७५ धावांची धुवाधार खेळी केली. तर, एबीने ४२ चेंडूंत ७ चौकार व ६ षटकारांसह ८२ धावा चोपल्या. अखेरच्या क्षणी सर्फराझने धमाकेदार फलंदाजी करताना हैदराबादच्या गोलंदाजीतील हवाच काढली.

संक्षिप्त धावफलक :
रॉयल चॅलेंजर्स बँगलोर : २० षटकांत ४ बाद २२७ धावा (एबी डिव्हीलियर्स ८२, विराट कोहली ७५, सर्फराझ खान नाबाद ३५; मुस्तफिझूर रहमान २/२६, भुवनेश्वर कुमार २/५५) वि. वि. सनरायझर्स हैदराबाद : २० षटकांत ६ बाद १८२ धावा (डेव्हिड वॉर्नर ५८, आशिष रेड्डी ३२, कर्ण शर्मा नाबाद २६, इआॅन मॉर्गन नाबाद २२; शेन वॉटसन २/३०, यजुवेंद्र चहल २/४३).

Web Title: RCB's booming win

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.