‘आरसीबी’चा शेवट गोड
By admin | Published: May 15, 2017 01:34 AM2017-05-15T01:34:50+5:302017-05-15T01:35:14+5:30
यंदाच्या सत्रात अत्यंत खराब कामगिरी झालेल्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने स्पर्धेतील अखेरच्या साखळी सामन्यात दिल्ली डेअरडेव्हिल्सला १० धावांनी नमवून आयपीएल - १० चा शेवट गोड केला.
नवी दिल्ली : यंदाच्या सत्रात अत्यंत खराब कामगिरी झालेल्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने स्पर्धेतील अखेरच्या साखळी सामन्यात दिल्ली डेअरडेव्हिल्सला १० धावांनी नमवून आयपीएल - १० चा शेवट गोड केला. या विजयानंतरही आरसीबी गुणतालिकेत तळाला राहिले. याआधी दोन्ही संघांचे स्पर्धेचे आव्हान संपुष्टात आल्याने हा सामना केवळ औपचारिक म्हणून राहिला होता.
फिरोझशाह कोटला स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात आरसीबीने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर त्यांनी निर्धारित षटकांत ६ बाद १६१ धावांची समाधानकारक मजल मारली. या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीकरांना १५१ धावांवर बाद करून आरसीबीने विजय मिळवला. पवन नेगी (३/१०) आणि हर्षल पटेल (३/४३) यांनी अचूक मारा करून दिल्लीकरांना
जखडवून ठेवले. ऋषभ पंत (४५) व
श्रेयस अय्यर (३२) यांनी दिल्लीच्या
आशा कायम राखल्या होत्या. मात्र, दोघेही बाद झाल्यानंतर आरसीबीने पकड मिळवली.
तत्पूर्वी, कर्णधार विराट कोहलीचे (४५ चेंडूंत ५८ धावा) शानदार अर्धशतक आणि ख्रिस गेलची (३८ चेंडूंत ४८) फटकेबाजी या जोरावर आरसीबीने समाधानकारक मजल मारली. कोणत्याही दडपणाशिवाय खेळताना गेलने आक्रमक सुरुवात केली. परंतु, विष्णू विनोद झटपट परतल्यानंतर त्याने काहीसा सावध पवित्रा घेत कोहलीला अधिक स्ट्राइक देण्याचा प्रयत्न केला. जम बसल्यावर मात्र त्याने काही अप्रतिम फटके मारले. या दोघांचा अपवाद वगळता इतर फलंदाज
अपयशी ठरल्याने आरसीबीची मजल मर्यादित राहिली.
संक्षिप्त धावफलक :
रॉयल चॅलेंजर्स बँगलोर : २० षटकांत ६ बाद १६१ धावा (विराट कोहली ५८, ख्रिस गेल ४८; पॅट कमिन्स २/२१) वि. वि. दिल्ली डेअरडेव्हिल्स : २० षटकांत सर्व बाद १५१ धावा (ऋषभ पंत ४५, श्रेयस अय्यर ३२; पवन नेगी ३/१०, हर्षल पटेल ३/४३).