‘आॅल इंग्लंड’ स्पर्धेसाठी सज्ज : सायना नेहवाल
By admin | Published: March 5, 2017 11:53 PM2017-03-05T23:53:11+5:302017-03-05T23:53:11+5:30
इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये जगातील सर्वोत्तम खेळाडूंचा सामना करण्यास आपण सज्ज असल्याचे सांगितले.
नवी दिल्ली : पुन्हा तंदुरुस्त झालेली आणि कडवे आव्हान पेलण्यासाठी कटिबद्ध असलेली भारतीय बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिने पुढील आठवड्यात होणाऱ्या प्रतिष्ठित इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये जगातील सर्वोत्तम खेळाडूंचा सामना करण्यास आपण सज्ज असल्याचे सांगितले.
दुखापतीतून सावरल्यानंतर सायनाचे लक्ष्य बॅडमिंटनमध्ये पुन्हा अव्वल स्थान मिळविणे हे असेल. सायना म्हणाली, ‘माझे लक्ष्य जगात सर्वोत्तम बॅडमिंटन खेळाडूंत समाविष्ट होणे हे आहे. तसेच सर्वोत्तम खेळाडूंच्या कडव्या आव्हानाचा सामना करण्यातच बॅडमिंटन खेळण्याचा खरा आनंद असतो. मी २0१५ वर्षी आॅल इंग्लंड चॅम्पियनशिपमध्ये उपविजेती होती; परंतु कारोलिना (मारीन) हिचा सामना करणे सर्वांत मोठे आव्हान होते. तिने माझ्यावर वर्चस्व मिळविले आणि विजेतेपद पटकाविण्यात ती यशस्वी ठरली.’
गुडघेदुखीमुळे सायना रिओ आॅलिम्पिकच्या योजनेला धक्का बसला होता. त्यानंतर तिने पुन्हा पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी मानसिक मजबुती दाखविली आणि आॅगस्टमध्ये शस्त्रक्रिया झाल्यानंतरही तिने पुनरागमन केले. या २६ वर्षीय खेळाडूने गेल्यावर्षी चायना, हाँगकाँग आणि मकाऊ ओपनमध्ये सहभाग नोंदविला आणि यावर्षी जानेवारीत प्रीमिअर बॅडमिंटन लीगमध्येही सहभाग नोंदविला.
सायना म्हणाली, ‘माझ्याकडे मलेशिया मास्टर्सआधी तयारीसाठी पुरेसा वेळ नव्हता; परंतु आता मी तंदुरुस्त आहे आणि दुखापत हे कारण नाही. कोणत्याही स्पर्धेच्या १५ दिवस आधी आपल्या प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली कठोर सराव करणे खूप आवश्यक होते. मला मलेशिया ओपननंतर सरावास पुरेशी संधी मिळाली. मी खेळातील नव्या बाबी लक्षात ठेवून विमल यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे.
>आता मी तंदुरुस्त आणि चांगल्या रीतीने सज्ज आहे आणि त्यामुळे आपल्या प्रतिस्पर्ध्यांचा सामना करण्यासाठी सज्ज आहे. - सायना नेहवाल