अफगाणिस्तान पदार्पणात छाप सोडण्यास सज्ज
By Admin | Published: February 18, 2015 01:48 AM2015-02-18T01:48:52+5:302015-02-18T01:48:52+5:30
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेकदा चमकदार कामगिरी करणारा अफगाणिस्तान संघ विश्वकप स्पर्धेत बुधवारी पदार्पणाच्या लढतीत छाप सोडण्यास उत्सुक आहे.
बांगलादेशविरुद्ध आज लढत : हिशोब चुकता करण्याची संधी
कॅनबेरा : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेकदा चमकदार कामगिरी करणारा अफगाणिस्तान संघ विश्वकप स्पर्धेत बुधवारी पदार्पणाच्या लढतीत छाप सोडण्यास उत्सुक आहे. अफगाणिस्तान संघाला ‘अ’ गटात बुधवारी बांगलादेशच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. या लढतीत धक्कादायक निकाल नोंदविण्यास अफगाणिस्तान संघ प्रयत्नशील आहे.
युद्धजन्य परिस्थितीमध्ये वावरत असलेल्या अफगाणिस्तानच्या खेळाडूंच्या संघर्षाची कहाणी जगातील क्रिकेट चाहत्यांना भावूक करणारी आहे, पण बुधवारी मैदानावर विश्वकप स्पर्धेसाठी पात्रता मिळविणाऱ्या या संघाच्या कामगिरीत किती सुधारणा झाली? याचे उत्तर मिळणार आहे.
आयसीसी मानांकनामध्ये हा संघ असोसिएट सदस्यांमध्ये सर्वोत्तम मानांकन असलेला संघ आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कामगिरीत सातत्य राखण्यात अपयशी ठरलेल्या बांगलादेश संघासोबत त्यांची लढत होणार आहे. बांगलादेश संघ विश्वक्रिकेटमध्ये स्वत:चे स्थान निर्माण करण्यासाठी संघर्ष करीत आहे. उभय संघांदरम्यान यापूर्वीही लढत झालेली आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यात आशिया कप स्पर्धेत अफगाणिस्तान संघाने बांगलादेशविरुद्ध ३२ धावांनी विजय मिळवित धक्कादायक निकाल नोंदविला होता. या वेळीही अफगाणिस्तान संघ धक्कादायक निकाल नोंदविण्यास उत्सुक आहे.
अफगाणिस्तान संघाचे प्रशिक्षक अॅण्डी मोल्स यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे की, साखळी फेरीत बांगलादेश व स्कॉटलंडविरुद्ध विजय मिळविण्यास प्रयत्नशील आहे.
दुसऱ्या बाजूचा विचार करता विश्वकप स्पर्धेत सहभागी होताना बांगलादेश संघाचे मनोधैर्य उंचावलेले आहे. विश्वकप स्पर्धेपूर्वी बांगलादेश संघाने झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत विजय मिळविला होता. बांगलादेश संघाच्या कामगिरीमध्ये आवश्यक ती सुधारणा झालेली नाही(वृत्तसंस्था)
लौकिकाला साजेशी कामगिरी केली तर अफगाणिस्तान संघ बांगलादेश संघाला आव्हान देण्यास सक्षम आहे. आम्ही स्कॉटलंड संघाविरुद्ध वर्चस्व गाजवू शकतो. या दोन्ही सामन्यांत विजय मिळविला तर बाद फेरी गाठण्यासाठी एका दिग्गज संघाविरुद्ध विजय मिळविणे आवश्यक आहे. आम्ही धक्कादायक निकाल नोंदविण्यास सक्षम आहोत.
- अॅण्डी मोल्स,
अफगाणिस्तान संघाचे प्रशिक्षक
बांगलादेश : मशरफे मोर्ताझा (कर्णधार), अल आमीन हुसेन, अनामुल हक, अराफत सन्नी, महमुदुल्लाह, मोमिनुल हक, मुशफिकर रहिम (यष्टीरक्षक), नासीर हुसेन, रुबेल हुसेन, सब्बीर रहमान, शकिब अल हसन, सौम्या सरकार, तैजुल इस्लाम, तमीम इकबाल, तस्कीन अहमद
अफगाणिस्तान : मोहम्मद नाबी (कर्णधार), अफसार जाजाई (यष्टीरक्षक), आफ्ताब आलम, असघर स्तानिक्झाई, दवलत जद्रान, गुलबादीन नैब, हामिद हसन, जावेद अहमदी, मिरवैस अर्शफ, नाजीबुल्लाह जद्रान, नासीर जमाल, नवरोज मंगल, सॅमिउल्लाह शेनवारी, शपूर जद्रान, उसमान घानी, हशमातुल्लाह शाइदी, इजातुल्लाह दवलतजाई, शाफिकउल्लाह, शराफुद्दीन अशराफ