मुंबईकर वचपा काढण्यास सज्ज

By admin | Published: April 24, 2017 12:58 AM2017-04-24T00:58:39+5:302017-04-24T00:58:39+5:30

सलग सहा विजय मिळवून तुफान फॉर्म असलेला मुंबई इंडियन्स संघ सोमवारी रायझिंग पुणे सुपरजायंट्सविरुद्ध भिडेल. यंदाच्या

Ready to remove Mumbaikar Vacha | मुंबईकर वचपा काढण्यास सज्ज

मुंबईकर वचपा काढण्यास सज्ज

Next

मुंबई : सलग सहा विजय मिळवून तुफान फॉर्म असलेला मुंबई इंडियन्स संघ सोमवारी रायझिंग पुणे सुपरजायंट्सविरुद्ध भिडेल. यंदाच्या मोसमातील पहिल्या सामन्यात पुण्याविरुद्ध झालेला पराभव वगळता मुंबईने आतापर्यंत सर्व सामने जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. त्यामुळेच, मुंबईकर पहिल्या सामन्यात झालेल्या पराभवाचा वचपा काढण्याच्या निर्धाराने घरच्या मैदानावर उतरतील.
पुण्याने सलग दोन विजयांची नोंद करताना चांगली लय मिळवली आहे. हीच लय कायम ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. परंतु, सध्या तुफान फॉर्ममध्ये असलेल्या मुंबईचे तगडे आव्हान असल्याची जाणीव त्यांना असल्याने पुण्याला विजयासाठी सर्वोत्तम खेळ करणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे, रविवारी झालेल्या सामन्याआधी मुंबईने सर्व विजय धावांचा पाठलाग करताना मिळवले होते. परंतु, दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्ध मर्यादित धावसंख्येचे यशस्वी संरक्षण करून मुंबईकरांनी स्वत:ला सिद्ध केले आहे.
फलंदाजी आणि गोलंदाजी याचा योग्य ताळमेळ ही मुंबईकरांची ताकद आहे. जोस बटलर - पार्थिव पटेल ही सलामी जोडी मुंबईला आक्रमक सुरुवात करून देत आहे. तसेच, नितीश राणामुळे मुंबईची फलंदाजी बळकट बनली आहे. हार्दिक पांड्या, किरॉन पोलार्ड आणि कृणाल पांड्या यांच्यामुळे मुंबईची मधली फळीदेखील मजबूत आहे. प्रश्न आहे तो रोहित शर्माच्या फॉर्मचा. सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात नेहमी अपयशी ठरणारा रोहित पुण्याविरुद्ध तळपणार का, हीच मोठी चिंता मुंबईपुढे असेल. शिवाय दुखापतीमुळे सुरुवातीच्या सामन्यांना मुकलेल्या अंबाती रायुडूला अंतिम संघात स्थान मिळू शकते. गोलंदाजीमध्ये हुकमी लसिथ मलिंगाने आपल्या गेल्या दोन सामन्यांत ५० हून अधिक धावांची खैरात केल्याने मुंबईच्या चिंतेत भर पडली आहे. त्याचवेळी गतसामन्यात मलिंगाऐवजी खेळविण्यात आलेल्या मिशेल जॉन्सनने टिच्चून मारा करताना एक षटक निर्धाव टाकत दिल्लीकरांना जखडवून ठेवले होते. त्यामुळे पुण्याविरुद्धही त्याला संघात कायम ठेवण्याची शक्यता आहे. तसेच, मिशेल मॅक्लेनघन, जसप्रीत बुमराह, हरभजन सिंग हे त्रिकूट चांगल्या
फॉर्ममध्ये आहे. या सर्वांना साथ देण्यासाठी अष्टपैलू पांड्याबंधू सक्षम असल्याने मुंबई सर्वचबाबतीत पुण्यापेक्षा वरचढ दिसत आहे.
दुसरीकडे, पुण्याच्या दृष्टीने पाहायला गेल्यास अजिंक्य रहाणेकडून संघाला मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. त्यात ‘घरच्या मैदाना’चा म्हणजे वानखेडे स्टेडियमचा मोठा अनुभव पाठीशी असल्याने पुणेकरांना फायदा होऊ शकतो. त्यामुळेच मुंबई इंडियन्सला प्रथम या मूळ ‘मुंबईकर’ला बाद करणे आवश्यक आहे. शिवाय खराब फॉर्ममुळे टीकेला सामोरे जावे लागत असलेल्या महेंद्रसिंह धोनीने गतसामन्यात हैदराबादविरुद्ध मॅचविनिंग खेळी करून मुंबईला एकप्रकारे धोक्याचा इशाराच दिला आहे. तसेच कर्णधार स्टिव्ह स्मिथ आणि अष्टपैलू बेन स्टोक्स यांचेही विशेष आव्हान मुंबईपुढे असेल.
गोलंदाजीमध्ये इम्रान ताहिर पुण्याचे ट्रम्प कार्ड असेल. त्याने पहिल्या सामन्यात प्रमुख फलंदाजांना माघारी धाडत मुंबईचे कंबरडे मोडले होते. याच कामगिरीच्या पुनरावृत्तीची आशा पुणेकरांना असेल. त्याचप्रमाणे अन्य ‘मुंबईकर’ शार्दुल ठाकूरचा मारा पुण्यासाठी निर्णायक ठरू शकतो. देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईचे प्रतिनिधित्व करणारा शार्दुल वानखेडेची खेळपट्टी चांगल्या पद्धतीने ओळखून असल्याने एकप्रकारे गोलंदाजीची धुरा त्याच्याकडेच असेल. (क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: Ready to remove Mumbaikar Vacha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.