पुणे गुजरातविरुद्ध विजयी लय राखण्यास सज्ज
By admin | Published: May 1, 2017 01:33 AM2017-05-01T01:33:04+5:302017-05-01T01:33:04+5:30
शनिवारी रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघावरील दणकेबाज विजयाने आत्मविश्वास दुणावलेला रायझिंग पुणे सुपर जायंटचा संघ उद्या
पुणे : शनिवारी रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघावरील दणकेबाज विजयाने आत्मविश्वास दुणावलेला रायझिंग पुणे सुपर जायंटचा संघ उद्या, सोमवारी इंडियन प्रीमिअर लीगच्या दहाव्या पर्वातील लढतीत गुजरात लायन्सविरुद्ध तीच लय कायम ठेवण्याच्या निर्धाराने मैदानात पाऊल ठेवेल.
प्रारंभी, गुणतालिकेत तळाला राहिल्यानंतर सुपर जायंटने जबरदस्त मुसंडी मारत गेल्या पाच सामन्यांपैकी चारमध्ये विजय मिळवत चौथ्या स्थानावर झेप घेतली. आता त्यांचे ९ सामन्यांतील ५ विजयांसह १0 गुण झाले आहेत आणि उद्या विजय मिळवल्यास त्यांचे अव्वल चौथे स्थान कायम राहील आणि त्याचबरोबर दहाव्या पर्वाच्या प्लेआॅफमध्ये स्थान मिळवण्याच्या त्यांच्या आशेला बळ मिळणार आहे. दुसरीकडे गुजरात लायन्सचा संघ ९ सामन्यांतील आठ गुणांसह सहाव्या स्थानावर आहे आणि त्यांना प्लेआॅफमध्ये पोहोचण्याच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी सर्वच सामने जिंकावे लागतील. सुपर जायंटचा शनिवारी रॉयल चॅलेंजर्स बँगलोरविरुद्ध ६१ धावांच्या विजयानंतर आत्मविश्वास दुणावलेला असेल. कर्णधार स्टीव्ह स्मिथ, अजिंक्य रहाणे, महेंद्रसिंह धोनी, मनोज तिवारी आणि स्थानिक खेळाडू राहुल त्रिपाठी यांच्यावरही पुणे संघाची फलंदाजीची मदार असेल. दुसरीकडे लायन्स शनिवारी रात्री मुंबई इंडियन्सकडून सुपर ओव्हरमध्ये स्वीकारावा लागलेला पराभव विसरून कामगिरी उंचावण्याचे आव्हान त्यांच्यावर असेल.
मुंबई इंडियन्सविरुद्ध प्रभावी गोलंदाजी करणारा जेम्स फॉकनर, बासील थम्पी यांच्याकडून गुजरातला पुन्हा चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.