वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी सज्ज
By Admin | Published: June 30, 2016 05:51 AM2016-06-30T05:51:34+5:302016-06-30T05:51:34+5:30
कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियासाठी यंदाचे सत्र अत्यंत व्यस्त आहे.
बंगळुरू : कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियासाठी यंदाचे सत्र अत्यंत व्यस्त आहे. त्यादृष्टीने युवा खेळाडूंमधून कसोटीपटू घडविणे आपल्यापुढील अवघड आव्हान असेल, असे मत नवनियुक्त कोच अनिल कुंबळे यांनी व्यक्त केले.
वर्षभरासाठी कोचपद स्वीकारल्यानंतर बुधवारी बोलाविलेल्या अधिकृत पत्रकार परिषदेत कुंबळे म्हणाले, ‘‘कसोटी क्रिकेट भक्कम करण्यास माझे प्राधान्य असेल. जे खेळाडू गेल्या काही महिन्यांत अनेक टी-२० सामने खेळले, त्यांना कसोटीसाठी तयार करणे हे माझ्यापुढील मोठे आव्हान असेल. चाहत्यांना कसोटी क्रिकेटकडे वळविणे माझ्याइतकीच भारतीय संघाची जबाबदारी असेल. हा प्रकार अधिक रोमहर्षक झाल्यास चाहते कसोटी क्रिकेटकडे परततील.’’
कुंबळेंची पहिली असाईनमेंट वेस्ट इंडिज दौरा ही आहे. या दौऱ्यात भारतीय संघ मालिका जिंकेल, असा आशावाद व्यक्त करीत कुंबळे म्हणाले, ‘‘विंडीज दौऱ्यासाठी आम्ही सज्ज आहोत. विंडीजमधील खेळपट्ट्या भारतासारख्याच आहेत. विंडीज संघ मर्यादित षटकांच्या सामन्यात भक्कम असला तरी आम्ही कसोटीत त्यांना पराभूत करू, अशी आशा आहे. कसोटी मालिका विजय हे आमचे ‘टार्गेट’ राहील.’’
भारतीय संघातील चार खेळाडू आधी विंडीज दौऱ्यावर गेले आहेत. याशिवाय अनेक जण भारतीय अ संघातून विंडीजमध्ये खेळले. प्रतिभावान खेळाडू दौऱ्यात स्वत:ची उपयुक्तता सिद्ध करतील, इतके सांगू शकतो. ईशांत शर्मा, मुरली विजय, विराट कोहली, लेगस्पिनर अमित मिश्रा या सर्वांनी प्रभावी कामगिरी केली होती. संघाचे सहा दिवसांचे तयारी शिबिर जोरात सुरू आहे. सध्या वेगवान गोलंदाजी कोच नसल्याने गोलंदाजांसाठी स्वत: वेगळे शिबिर आयोजिण्याची तयारी ‘जम्बो’ने दाखविली. कुंबळे आठ वर्षांनंतर भारतीय ड्रेसिंग रूममध्ये परतले आहेत.’’
ते म्हणाले, ‘‘मी महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहली या दोन्ही कर्णधारांसोबत चर्चा केली. आम्ही जिंको अथवा हरो, पण कर्णधारांना माझा संपूर्ण पाठिंबा राहील. सर्वच खेळाडूंमध्ये क्षमता असल्याने मी पडद्यामागून सर्वांना ताकद देणार आहे. ज्या संघासोबत मी खेळलो तेव्हाचा संघ आणि सध्याचा संघ यात कमालीची तफावत आहे. सध्याच्या टीममधील खेळाडूंचे वय सरासरी २५ आहे. फिल्डिंगमध्ये सध्याच्या संघात प्रतिभावान खेळाडू असून हे खेळाडू अष्टपैलू कामगिरी करू शकतात. युवा खेळाडूंनी लहान वयात बरेच काही मिळविले. विराटकडे ४०, तर ईशांतकडे ६० कसोटी सामने खेळण्याचा अनुभव आहे. आयपीएलमध्ये मी स्वत: युवा खेळाडूंसोबत वेळ घालविला असल्याने दडपणात कसा संयम पाळायचा याचे धडे देणार आहे.’’(वृत्तसंस्था)