भारतीय नेमबाज विश्वचषकात पदक जिंकण्यासाठी सज्ज
By admin | Published: February 24, 2017 01:12 AM2017-02-24T01:12:31+5:302017-02-24T01:16:56+5:30
फॉर्ममध्ये असलेले प्रतिभावान नेमबाज स्थानिक परिस्थितीचा लाभ घेत येथील कर्णिसिंग शूटिंग रेंजमध्ये
नवी दिल्ली : फॉर्ममध्ये असलेले प्रतिभावान नेमबाज स्थानिक परिस्थितीचा लाभ घेत येथील कर्णिसिंग शूटिंग रेंजमध्ये उद्या शुक्रवारपासून सुरू होत असलेल्या आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत पदक जिंकण्याच्या निर्धाराने उतरणार आहेत.
अभिनव बिंद्रा आणि गगन नारंग यांच्या अनुपस्थितीत भारतीय संघात तीन नवे चेहरे आहेत. बिंद्राने आॅलिम्पिकनंतर निवृत्ती जाहीर केली, तर गगन विश्वचषकाच्या केवळ रायफल प्रोन प्रकारातच पात्र ठरला आहे. पहिल्या दिवशी सत्येंद्रसिंग रवी कुमार आणि दीपक कुमार हे १० मीटर एअर रायफलमध्ये भारताचे आव्हान सादर करतील. महिलांच्या दहा मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात पूजा घाटकर, मेघना सज्जानर आणि विनिता भारद्वाज यांच्यासोबत आॅलिम्पिकचा अनुभव बाळगणारी अपूर्वी चंदेला हीदेखील रेंजमध्ये उतरणार आहे. महिला ट्रॅप प्रकारात राजेश्वरी कुमारी, सीमा तोमर आणि मनीषा खीर, तर शगुन चौधरी आणि श्रेयसी सिंग या किमान पात्रता गाठण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.
रिओ आॅलिम्पिकआधी भारतीय खेळाडूंची कामगिरी चांगली झाली; पण आॅलिम्पिकमधील अपयशानंतर भारतीय नेमबाजी संघटनेने अपयशाची चौकशी केली. ४ मार्चपर्यंत चालणाऱ्या विश्वचषकात ५० देशांचे ४५२ नेमबाज सहभागी होत आहेत. त्यात सध्याचे विश्वविजेते, आॅलिम्पिक चॅम्पियन आणि विविध उपखंडातील विजेत्यांचा समावेश आहे. नेमबाजीतील प्रसिद्ध चेहऱ्यांमध्ये डायना बाकोसी, गॅब्रियल रोसेटी, मेंगशुई झांग, किम्बर्ले ऱ्होड्स आणि नासिर अल अतैया यांचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)