वेस्ट इंडिज आव्हान पेलण्यास सज्ज
By Admin | Published: February 24, 2015 12:10 AM2015-02-24T00:10:24+5:302015-02-24T00:10:24+5:30
गेल्या लढतीत पाकिस्तानविरुद्ध शानदार विजय नोंदविणाऱ्या वेस्ट इंडिज संघाचा आत्मविश्वास उंचावलेला असून त्यांना मंगळवारी ‘ब’ गटातील लढतीत झिम्बाब्वेच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.
कॅनबेरा : गेल्या लढतीत पाकिस्तानविरुद्ध शानदार विजय नोंदविणाऱ्या वेस्ट इंडिज संघाचा आत्मविश्वास उंचावलेला असून त्यांना मंगळवारी ‘ब’ गटातील लढतीत झिम्बाब्वेच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.
सलामी लढतीत आयर्लंडविरुद्ध पराभव स्वीकारणाऱ्या वेस्ट इंडिज संघाने शनिवारी ख्राईस्टचर्चमध्ये खेळल्या गेलेल्या लढतीत पाकिस्तानचा १५० धावांनी पराभव केला आणि या २०१५ च्या विश्वकप स्पर्धेत गुणाचे खाते उघडले. झिम्बाब्वेनेही यापूर्वीच्या लढतीत संयुक्त अरब अमिरातचा ४ गडी राखून पराभव करीत दोन गुणांची कमाई केली. वेस्ट इंडिजने आतापर्यंत झिम्बाब्वेविरुद्ध खेळल्या गेलेल्या ४४ पैकी ३४ सामन्यांत विजय मिळविला आहे, पण आयर्लंडने विश्वकप स्पर्धेत धक्कादायक निकाल नोंदवले जाणार असल्याची प्रचीती दिली आहे. आयर्लंड संघाविरुद्ध पराभव स्वीकारणाऱ्या विंडीज संघावर टीकेची झोड उठली, पण अष्टपैलू आंद्रे रसेलच्या मते संघाला आता सूर गवसला आहे.
पाकविरुद्ध अष्टपैलू कामगिरी करीत सामनावीर ठरलेला रसेल म्हणाला, ‘‘आयर्लंडविरुद्ध पराभव स्वीकारावा लागल्यानंतर अशा प्रकारचा विजय सुखावह आहे. या विजयामुळे विंडीज संघ काय करू शकतो, याची प्रतिस्पर्ध्यांना कल्पना आलेली आहे. आमचा दिवस असेल तर आम्ही कुठल्याही प्रतिस्पर्ध्याला पराभूत करू शकतो. संघाला सूर गवसला असून आम्ही कामगिरीत सातत्य राखण्यास प्रयत्नशील आहोत.’’
विंडीज संघासाठी सलामीवीर ख्रिस गेलचा फॉर्म चिंतेचा विषय आहे. पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत तो केवळ ४ धावा काढून तंबूत परतला. गेल्या १९ डावांत त्याची सरासरी केवळ १४.४२ आहे. २० महिन्यांपूर्वी त्याने अखेरची शतकी खेळी केली होती.
पाकविरुद्धच्या लढतीत दुखापतग्रस्त झालेला अष्टपैलू ड्वेन ब्राव्होच्या खेळण्याबाबत साशंकता आहे. झिम्बाब्वेचा कर्णधार एल्टन चिगुम्बुरा म्हणाला, ‘‘आम्ही विंडीज संघाला पराभूत करण्यास उत्सुक आहोत.’’ पहिल्या लढतीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभव स्वीकारावा लागल्यानंतरही झिम्बाब्वे संघाच्या कामागिरीची प्रशंसा झाली होती. दुसऱ्या लढतीत झिम्बाब्वेने संयुक्त अरब अमिरातीचा पराभव केला. त्या लढतीत नाबाद ७६ धावांची खेळी करणारा सीन विलियम्सने सर्वोत्तम कामगिरी करण्यास उत्सुक असल्याचे म्हटले आहे.
विलियम्स म्हणाला, ‘‘प्रतिस्पर्धी संघाबाबत आदर आहे. विंडीज
संघात सामन्याचे चित्र पालटण्याची क्षमता असलेल्या गेलचा समावेश आहे. आम्हाला चांगली कामगिरी करावी लागेल.’’ (वृत्तसंस्था)