खरी परीक्षा २०१८ मध्ये !
By admin | Published: December 22, 2016 12:32 AM2016-12-22T00:32:43+5:302016-12-22T00:32:43+5:30
सलग १८ कसोटीत विजय आणि एका वर्षात सर्वाधिक आठ विजय मिळविल्यानंतरही मोठे स्वप्न उराशी बाळगणारा भारतीय संघाचा
खरी परीक्षा २०१८ मध्ये !
नवी दिल्ली : सलग १८ कसोटीत विजय आणि एका वर्षात सर्वाधिक आठ विजय मिळविल्यानंतरही मोठे स्वप्न उराशी बाळगणारा भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली व त्याच्या सहकाऱ्यांपुढे खरे आव्हान २०१८ मध्ये असेल. याच काळात संघाला द. आफ्रिका, इंग्लंड तसेच आॅस्ट्रेलियाचा दौरा करायचा आहे.
या तिन्ही देशातील वेगवान खेळपट्ट्यांवर मालिका जिंकणे तसेच २०१९ चा विश्वचषक जिंकणे असे दुहेरी आव्हान संघापुढे असेल. भारताने अजून आॅस्ट्रेलिया आणि आफ्रिकेत मालिका विजय साजरा केलेला नाही. मालिका विजय मिळविणारा पहिला कर्णधार बनण्यासाठी कोहली कमालीचा उत्सुक असेल. भारताने इंग्लंडमध्ये ज्या १७ मालिका खेळल्या त्यापैकी केवळ तीन जिंकल्या तर १३ मालिकांमध्ये पराभव पदरी पडला. एक मालिका अनिर्णीत राहिली होती. भारत-इंग्लंड यांच्या एकूण ५७ मालिका झाल्या. भारताने यापैकी केवळ सहा जिंकल्या.
भारत इंग्लंडविरुद्ध जानेवारीत तीन वन डे आणि तीन टी-२० सामने खेळणार आहे. यानंतर फेब्रुवारी-मार्चमध्ये आॅस्ट्रेलिया संघ चार कसोटी सामने खेळण्यासाठी भारतात दाखल होईल. गेल्या काही वर्षांत उपखंडात खेळणे आॅस्ट्रेलियासाठी कठीण जात आहे. त्यामुळेच कोहली अॅन्ड कंपनीवर भारतात विजय मिळविणे त्यांच्यासाठी सोपे नसणारच!
भारतीय संघ जूनमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी इंग्लंडला जाईल. पाठोपाठ वेस्ट इंडिजमध्ये पाच वन डे आणि एक टी-२० सामना खेळेल.
भारताचा विदेशात कसोटी दौरा आॅगस्ट २०१७ मध्ये श्रीलंकेपासून सुरू होणार आहे. तेथे तीन कसोटी आणि पाच वन डे तसेच एक टी-२० सामना खेळावा लागेल.
आॅक्टोबर २०१७ मध्ये आॅस्ट्रेलिया संघ पाच वन डेसाठी भारतात येईल. त्यानंतर आयसीसी वेळापत्रकानुसार नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये तीन कसोटी, पाच वन-डे आणि दोन टी-२० सामन्यांसाठी पाकिस्तान भारतात येणार आहे. सद्यस्थितीत ही मालिका शक्य नसल्याने अन्य संघाला पाचारण करण्याची भारताची योजना असेल.
जानेवारी २०१८ मध्ये भारत द. आफ्रिका दौऱ्यावर जाईल. या दौऱ्यात चार कसोटी, पाच वन डे आणि दोन टी-२० सामन्यांचे आयोजन होईल.
भारताने आफ्रिकेत आतापर्यंत सहा कसोटी मालिका खेळल्या. त्यापैकी पाच गमविल्या तर एक मालिका अनिर्णीत राहिली. भारत-द. आफ्रिका यांच्यात १७ कसोटी सामने झाले. त्यात दोन सामन्यात विजय मिळाला. आठ सामन्यात पराभव पत्करावा लागला. यावरून भारताला वेगवान खेळपट्ट्यांवर खेळणे किती कठीण जाते याची कल्पना येते.
मार्च २०१८ मध्ये श्रीलंका संघ तीन कसोटी, पाच वन डे आणि एक टी-२० खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर येईल. त्यानंतर जूनमध्ये आशिया कपचे आयोजन होईल. त्यानंतर लगेचच पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघ इंग्लंडकडे रवाना होईल. याच दौऱ्यात पाच वन डे आणि एक टी-२० सामन्याचे आयोजन होईल. त्यानंतर वेस्ट इंडिज संघ तीन कसोटी व प्रत्येकी एक वन डे तसेच टी-२० सामना खेळण्यासाठी भारतात दाखल होईल. नोव्हेंबरमध्ये भारत चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी आॅस्ट्रेलियाचा दौरा करणार आहे. जून २०१९ मध्ये इंग्लंडमध्ये विश्वचषकाचे आयोजन होईल. (वृत्तसंस्था)
कोहलीच्या आक्रमक नेतृत्वामुळेच यश : जयसूर्या
विराट कोहलीच्या आक्रमक नेतृत्वामुळेच भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध मालिका जिंकण्यात यशस्वी होऊ शकला, असे मत श्रीलंकेचा दिग्गज क्रिकेटपटू सनथ जयसूर्या याने बुधवारी पाटणा येथे व्यक्त केले. पुढील विश्वचषकात कुठला संघ जगज्जेता होईल, असा सवाल करताच जयसूर्याने हसून उत्तर दिले, अर्थात श्रीलंका! चेन्नईत ३०३ धावांची नाबाद खेळी करणाऱ्या करुण नायरची जयसूर्याने पाठ थोपटली. करुणच्या कामगिरीबद्दल सनथ म्हणाला, ‘हे सोपे काम नाही. यासाठी समर्पित भावना आणि संयम दोहोंची गरज असते.’ लंकेच्या माजी कर्णधाराने टीम इंडियाचे मुख्य कोच अनिल कुंबळेचेदेखील कौतुक केले. अनिलने कोच म्हणून करिअरला सुरुवात केली आहे. तो जसा महान गोलंदाज होता तसाच यशस्वी कोच म्हणून पुढे येईल, असे सनथ म्हणाला. भारतीय संघ सध्या विजयी घोडदौड करीत आहे. इंग्लंड संघाला सहजपणे नमविले. याचे सर्व श्रेय विराट कोहली याच्या आक्रमक नेतृत्वाला जाते. विराट चांगला कर्णधार असून, गोलंदाजांचा उपयोग तो फारच शिताफीने करून घेतो. तो स्वत: चांगली फलंदाजीदेखील करीत आहे.
भारताच्या दणकेबाज विजयात बनले अनेक विक्रम
भारताच्या इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील ४-0 विजयादरम्यान अनेक नवीन विक्रमे रचली गेली. भारताने आपली विजयी मालिका १८ सामन्यांपर्यंत पोहोचविली आहे. तसेच एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक ९ विजय मिळविण्याचा नवीन विक्रमही रचला आहे.
इंग्लंडविरुद्ध भारताने प्रथमच ४-0 असा विजय नोंदविला. याआधी भारताने मोहम्मद अझहरुद्दीनच्या नेतृत्वाखाली १९९२-९३ मध्ये आपल्या भूमीवर ३-0, असा मालिका विजय मिळविला होता. रवींद्र जडेजाने इंग्लंडचा अखेरचा फलंदाज तंबूत धाडल्यानंतर एम. ए. चिदंबरम स्टेडियममध्ये विजयी जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते.
भारताने गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यापासून सलग पाचवी कसोटी मालिका जिंकली. त्यामुळे कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामन्यात अपराजित राहण्याचे आपले नवे रेकॉर्डही भारताने केले. याआधी भारताने १९८५ ते १९८७ मध्ये सलग १७ सामने जिंकले होते.
पाचव्या आणि अखेरच्या कसोटीत भारताने आपला डाव ७ बाद ७५९ या धावसंख्येवर घोषित केला जी की, भारताची आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या आहे. भारताने हा सामना एक डाव आणि ७५ धावांनी जिंकला. जो त्यांचा इंग्लंडविरुद्धचा सर्वात मोठा विजय आहे.
कसोटी मालिका ४-0 ने जिंकण्याची भारताची ही दुसरी वेळ आहे. याआधी भारताने २0१२-१३ मध्ये आॅस्ट्रेलियाला चार सामन्यांच्या मालिकेत ४-0 अशी धूळ चारली होती. भारताने यावर्षी कॅलेंडर वर्षात १२ सामन्यांपैकी ९ सामन्यांत विजय नोंदवला व अशा प्रकारे त्यांनी २0१0 मध्ये १४ सामन्यांत आठ विजयाच्या आपल्या रेकॉर्डमध्ये सुधारणा केली.
इंग्लंडच्या दुसऱ्या डावात जडेजाने अॅलेस्टर कुक याची विकेट मालिकेत सहाव्यांदा घेतली जो की, नवीन विक्रम आहे. या सामन्यात अर्धशतक ठोकणारा व एकूण दहा गडी व चार झेल पकडणारा जडेजा पहिला अष्टपैलू खेळाडू बनला.
करुण नायर हा महान फलंदाज बॅ्रडमन आणि बॉब सिम्पसननंतर तिसरा असा फलंदाज आहे की, ज्याने आपल्या पहिला शतकाचे त्रिशतकात परिवर्तन केले.
नायरने २५ वर्षे १0 दिवसांच्या वयात त्रिशतक ठोकले आणि तो सर्वात कमी वयात ही कामगिरी करणारा सहावा फलंदाज बनला. त्याने त्याच्या तिसऱ्या डावात ही कामगिरी केली आणि अशा प्रकारे सर्वात कमी डावात त्रिशतक ठोकण्याचा नवीन विक्रम केला. करुण नायर (नाबाद ३0३) भारताकडून त्रिशतक ठोकणारा दुसरा फलंदाज बनला.
याआधी वीरेंद्र सेहवागने दोनदा ही कामगिरी केली आहे.
या मालिकेत रवीचंद्रन आश्विन (३0६ धावा आणि २८ बळी) व जडेजा यांनी एकाच कसोटी मालिकेत २00 पेक्षा जास्त धावा आणि २५ पेक्षा जास्त विकेट घेऊन डबल धमाका केला, अशी कामगिरी करणारे हे पहिले असे दोन अष्टपैलू खेळाडू ठरले आहेत. कपिल देव (तीन वेळा), विनू मांकड आणि आश्विननंतर जडेजा भारताचे चौथे अष्टपैलू खेळाडू आहेत ज्यांनी एका कसोटी मालिकेत २00 पेक्षा जास्त धावा आणि २0 पेक्षा जास्त बळी घेतले.