देविंदरला वगळण्यामागे ठोस कारणे, क्रीडा महासंघांमधील अनागोंदी खपवून घेणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 05:43 AM2017-09-27T05:43:43+5:302017-09-27T05:43:48+5:30
‘टार्गेट आॅलिम्पिक पोडियम’(टॉप्स) या योजनेत खेळाडूंना योग्यतेच्या आधारेच स्थान दिले जाते. दुसरीकडे भालाफेकपटू देविंदरसिंग कांग याला वगळण्यामागे ठोस कारणे असल्याची माहिती क्रीडा सचिव इंजेती श्रीनिवास यांनी दिली.
नवी दिल्ली : ‘टार्गेट आॅलिम्पिक पोडियम’(टॉप्स) या योजनेत खेळाडूंना योग्यतेच्या आधारेच स्थान दिले जाते. दुसरीकडे भालाफेकपटू देविंदरसिंग कांग याला वगळण्यामागे ठोस कारणे असल्याची माहिती क्रीडा सचिव इंजेती श्रीनिवास यांनी दिली.
देविंदरने मागील महिन्यात विश्व अॅथलेटिक्स स्पर्धेत भालाफेकीत अंतिम फेरी गाठली होती. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच भारतीय ठरला. तथापि, टॉप्समधून वगळल्याबद्दल निराशा व्यक्त करीत त्याने इटलीला प्रस्थान करण्याचा विचार बोलून दाखविला. श्रीनिवास यांनी मात्र देविंदरच्या निराशेकडे दुर्लक्ष करीत सांगितले की, टॉप्समध्ये कुणाला स्थान मिळण्याची योग्यता, ही त्याची वैयक्तिक कामगिरीच असते. विश्व चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठल्यानंतरही त्याला योजनेतून वगळण्यामागे काही ठोस कारणे आहेत; पण मी या कारणांचा खुलासा करणार नाही. क्रीडा मंत्रालय देविंदरचा फेरविचार करू शकेल. त्याला वगळण्याचा निर्णय भारतीय अॅथलेटिक्स महासंघ व क्रीडा मंत्रालयाने घेतला. भविष्यात त्याला योजनेत स्थान मिळू शकते. ’
देविंदरने विश्व स्पर्धेत कांस्य जिंकले होते. टॉप्समध्ये स्थान मिळावे, यासाठी १ आॅक्टोबर रोजी क्रीडामंत्र्यांपुढे तो कैफियत मांडणार आहे. क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंग राठोड यांना यासंदर्भात विचारणा केली असता, त्यांनी मुलाखतीची माहिती नसल्याचे स्पष्ट केले. (वृत्तसंस्था)
‘स्पोर्टस् फॉर आॅल’या विषयावरील राष्टÑीय कार्यशाळेत बोलताना क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंग राठोड यांनी राष्टÑीय क्रीडा महासंघांमधील बेशिस्त आणि अनागोंदी खपवून घेणार नसल्याचा इशारा दिला. खेळाचे संचालन प्रामाणिक हेतूनेच व्हायला हवे, असे सांगून राठोड म्हणाले, ‘खेळात कुठलेही कुप्रशासन असू नये. संघ निवड आणि निकाल यात प्रामाणिकपणा बाळगावाच लागेल. सर्व माहिती जनतेपुढे यायलाच हवी, यावर मंत्रालय ठाम आहे. मंत्रालय धोरण आखेल, पण अंमलबजावणी व्यावसायिकपणेच व्हायला हवी. सर्व योजनांवर नजर ठेवण्यासाठी आम्ही सीईओ नेमण्याचा विचार करीत आहोत. २४ बाय ७ आणि ३६५ दिवस खेळात काय चालले आहे हे पाहणे, शिवाय हाय परफॉर्मन्स मॅनेजर्स आणि कोचेस यांच्या कामावरही नजर ठेवण्याचे काम होणार आहे.’