एका ट्रॉफीचा पुनर्जन्म!
By admin | Published: June 1, 2017 07:08 AM2017-06-01T07:08:24+5:302017-06-01T07:08:24+5:30
पुनर्जन्माबाबत तुम्ही बरंच काही ऐकलं असेलच. नाटक सिनेमामधून पुनर्जन्माच्या अनेक कथा पाहिल्या असतील. पण क्रिकेट जगतात चक्क एका ट्रॉफीचाच पुनर्जन्म
Next
>बाळकृष्ण परब/ऑनलाइन लोकमत
पुनर्जन्माबाबत तुम्ही बरंच काही ऐकलं असेलच. नाटक सिनेमामधून पुनर्जन्माच्या अनेक कथा पाहिल्या असतील. आजच्या विज्ञान युगात पुनर्जन्मासारख्या कथांवर विश्वास बसणे तसे कठीणच. पण क्रिकेट जगतात चक्क एका ट्रॉफीचाच पुनर्जन्म झालाय. हो, हे अगदी खरं आहे. या पुनर्जन्म झालेल्या ट्रॉफीचं नाव आहे आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी. आठव्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीला आजपासून इंग्लंडमध्ये सुरुवात होतेय. चार वर्षांपूर्वी बंद करण्यात आलेल्या या स्पर्धेला आयसीसीने पुन्हा सुरुवात केलीय. त्यामुळे हा या स्पर्धेचा पुनर्जन्मच म्हटला पाहिजे.
ट्वेंटी-20 क्रिकेटमुळे एकदिवसीय क्रिेकेटला फटका बसण्याची भीती ट्वेंटी-20 क्रिकेटला सुरुवात झाल्यापासून व्यक्त करण्यात येऊ लागली होती. त्याच काळात पहिली ट्वेंटी-20 विश्वचषक स्पर्धा आयोजित झाल्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अस्तित्वावर गंडांतर येऊ लागले.
सुमारे 20 वर्षांपूर्वी असोसिएट्स देशांमधील क्रिकेटप्रेमींना अव्वल दर्जाच्या क्रिकेटचा आनंद घेता यावा आणि आयसीसीच्या खात्यातही काही अधिकचे डॉलर पडावेत म्हणून ही स्पर्धा सुरू करण्यात आली होती. भारतीय क्रिकेटमध्ये रुपये आणि डॉलरची गंगा आणणारे दिवंगत जगमोहन दालमिया हे या स्पर्धेचे जन्मदाते. 1998 साली बांगलादेशात नॉकआऊट स्पर्धा या नावाने खेळवण्यात आलेली ही स्पर्धा तेव्हा कमालीची यशस्वी ठरली होती. 2000 साली झालेल्या दुसऱ्या स्पर्धेपर्यंत तिचे नाव नॉकआऊट स्पर्धा असेच होते.
पुढे 2002 साली श्रीलंकेत ही स्पर्धा आयोजित झाली. त्यावेळी तिचे नामकरण आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी असे करण्यात आले. 2013 पर्यंत ही स्पर्धा याच नावाने खेळवली गेली. जगातील अव्वल संघांचा सहभाग असल्याने या स्पर्धेला मिनी विश्वचषकाचा दर्जा मिळाला. पण हा मान मिळवताना ट्वेंटी-20 विश्वचषकाशी चॅम्पियन्स ट्रॉफीची टक्कर होऊ लागली. ट्वेंटी-20 क्रिकेटची वाढती लोकप्रियता आणि कसोटी विश्वचषक सुरू करण्याची कल्पना यात अखेर चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन बंद करण्याचा निर्णय आयसीसीने साली घेतला. त्याबरोबरच 2013 साली या स्पर्धेचे शेवटचे आयोजन इंग्लंडमध्ये करण्यात आले होते.
एकदिवसीय, ट्वेंटी-20 आणि कसोटी या क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये केवळ एकच जागतिक स्पर्धा असावी, अशी कल्पनाही आयसीसीमध्ये पुढे आली. त्यातून कसोटी अजिंक्यपद स्पर्धा नियोजित झाली. पण कसोटी क्रिकेटची घटलेली लोकप्रियता, प्रायोजकांनी घेतलेला आखडता हात, यामुळे कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा आयसीसीचा विचार बारगळला. त्याबरोबरच चॅम्पियन्स ट्रॉफीला पुनर्जन्म मिळाला. ज्या इंग्लंडच्या भूमिवर चॅम्पियन्स ट्रॉफीचे शेवटचे आयोजन करण्यात आले तेथेच ही स्पर्धा आजपासून नव्याने आयोजित होतेय. पण तिच्या भविष्याबाबत अनिश्चितता कायम आहे. या स्पर्धेचे पुढचे आयोजन 2021 साली भारतात नियोजित आहे. मात्र आयसीसीने प्रस्तावित केलेली वनडे लीग सुरू झाल्यास चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आयोजनाला पुन्हा ब्रेक लागू शकतो. त्यामुळे या स्पर्धेचे नेमके भविष्य काय हे ब्रह्मदेवालाच ठावूक!!! तूर्तास आपण यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीचा आनंद घेऊ, आगे जो होगा देखा जाएगा!!!