कुकला सापडली फॉर्मची रेसिपी

By admin | Published: July 28, 2014 03:28 AM2014-07-28T03:28:36+5:302014-07-28T03:28:36+5:30

कर्णधार अ‍ॅलिस्टर कुकला (९५ धावा, २३१ चेंडू, ९ चौकार) सूर गवसला असला तरी त्याला शतक झळकाविण्यात अपयश आले;

Recipe of cooked form | कुकला सापडली फॉर्मची रेसिपी

कुकला सापडली फॉर्मची रेसिपी

Next

साउथम्पटन : कर्णधार अ‍ॅलिस्टर कुकला (९५ धावा, २३१ चेंडू, ९ चौकार) सूर गवसला असला तरी त्याला शतक झळकाविण्यात अपयश आले; पण गॅरी बॅलन्स (नाबाद १०४ धावा, २०४ चेंडू, १५ चौकार) कारकिर्दीतील तिसरे शतक झळकाविण्यात यशस्वी ठरला. कुक व बॅलन्स यांनी दुसऱ्या विकेटसाठी केलेल्या १५८ धावांच्या भागीदारीच्या जोरावर रविवारपासून प्रारंभ झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात यजमान इंग्लंडने भारताविरुद्ध वर्चस्व गाजवले. पहिल्या दिवसअखेर इंग्लंडने पहिल्या डावात २ बाद २४७ धावांची दमदार मजल मारली. आजचा खेळ थांबला त्यावेळी शतकवीर बॅलन्सला इयान बेल (१६) साथ देत होता.
कुकने सुरुवातीला मिळालेल्या जीवदानाचा लाभ घेत ९५ धावांची खेळी केली तर बॅलन्सने (नाबाद १०४) शतक झळकाविले. दुखापतीमुळे ईशांत शर्माला या कसोटीतून माघार घ्यावी लागली. ईशांतच्या अनुपस्थितीत भारतीय गोलंदाजीची बाजू कमकुवत झाली. पहिल्या दिवशी केवळ मोहम्मद शमी (१-६२) आणि रवींद्र जडेजा (१-३४) यांना बळी मिळविता आले.
पहिल्या दोन कसोटी सामन्यांत चमकदार कामगिरी करणाऱ्या भुवनेश्वर कुमारने ५८ धावा बहाल केल्या; पण बळीचा विचार करता त्याची पाटी कोरीच राहिली. पदार्पणाची कसोटी खेळणाऱ्या पंकज सिंगला ६२ धावांच्या मोबदल्यात बळी घेता आला नाही. त्याला नशिबाची साथ लाभली नाही. त्याच्या गोलंदाजीवर जडेजाने कुकचा सोपा झेल सोडला. त्यावेळी कुक केवळ १५ धावांवर होता. अखेर जडेजाने कुकला शतकापासून रोखण्यात यश मिळविले. चहापानानंतर शतकाकडे वाटचाल करणारा कुक जडेजाच्या गोलंदाजीवर धोनीकडे झेल देत माघारी परतला. कुक पंच मारियास इरासमुसच्या निर्णयावर निराश दिसला. कुकने २३१ चेंडूंना सामोरे जाताना ९ चौकार ठोकले.
त्याआधी, कर्णधार अ‍ॅलिस्टर कुकने वैयक्तिक १५ धावांवर मिळालेल्या जीवनदानाचा लाभ घेत इंग्लंडला उपाहारापर्यंत १ बाद ७४ धावांची मजल मारून दिली. अर्धशतकाकडे वाटचाल करताना कुकने सूर गवसल्याचे संकेत दिले. त्याआधी, पदार्पणाची कसोटी खेळणाऱ्या पंकज सिंगच्या गोलंदाजीवर कुकचा उडालेला झेल तिसऱ्या स्लिपमध्ये तैनात जडेजाला टिपण्यात अपयश आले. जडेजाने त्यानंतर मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर सॅम रोबसनचा (२६) कठीण झेल टिपताना या चुकीची काही अंशी भरपाई केली. त्याआधी, नाणेफेकीपूर्वी टाचेच्या दुखापतीमुळे ईशांत शर्माने या लढतीतून माघार घेतली. त्याच्या स्थानी राजस्थानच्या पंकज सिंगला कसोटी पदार्पणाची संधी मिळाली. भारतीय संघाने स्टुअर्ट बिन्नीच्या स्थानी रोहित शर्माला संघात स्थान दिले. (वृत्तसंस्था)

Web Title: Recipe of cooked form

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.