भारतीय मुष्टियुद्ध संघटनेला मान्यता
By admin | Published: October 20, 2016 06:34 AM2016-10-20T06:34:41+5:302016-10-20T06:34:41+5:30
आंतरराष्ट्रीय हौशी मुष्टियुद्ध संघटनेने (आयबा) भारतीय मुष्टियुद्ध संघटनेला (बीएफआय) अखेर मान्यता दिली
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय हौशी मुष्टियुद्ध संघटनेने (आयबा) भारतीय मुष्टियुद्ध संघटनेला (बीएफआय) अखेर मान्यता दिली असून, यासंबंधीची माहिती आयबाच्या अध्यक्षांनी भारतीय आॅलिम्पिक संघटनेला (आयओए) दिली आहे.
बीएफआयची कार्यकारी परिषदेची पहिली बैठक नवी दिल्लीमध्ये अजय सिंग यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत कार्यकारी परिषदेचे सर्व सदस्य आणि सर्व वरिष्ठ अधिकारी यांची उपस्थिती होती. भारतीय मुष्टियुद्धाला पुन्हा एकदा योग्य मार्गावर आणण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय या बैठकीत घेण्यात आले. या बैठकीनंतर अजय सिंग यांनी सांगितले, की बीएफआयला आयबाची मान्यता मिळाली असून, त्या बाबतीत आयबाचे अध्यक्ष यांनी आयओएला कळविले आहे. तसेच, बीएफआयने केंद्रीय क्रीडा मंत्रालयची मान्यता आणि आयओएशी जोडण्यासाठी आवश्यक सर्व कागदपत्रे जमा केली आहेत.
दरम्यान, या बैठकीत सर्व वयोगटांची राष्ट्रीय स्पर्धा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच, महिलांच्या वरिष्ठ गटाची पहिली राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा उत्तराखंड मुष्टियुद्ध संघटनेच्या यजमानपदाखाली १९ ते २४ नोव्हेंबरदरम्यान हरिद्वार येथे आयोजित होईल. (वृत्तसंस्था)
तर, पुरुष वरिष्ठ गटाची पहिली राष्ट्रीय स्पर्धा डिसेंबरला गुवाहाटी येथे आयोजित होईल.