तब्बल 115 वर्षांनंतर झाली या विक्रमाची पुनरावृत्ती
By admin | Published: March 7, 2017 08:48 PM2017-03-07T20:48:30+5:302017-03-07T20:48:30+5:30
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अनेक विक्रमांची नोंद झाली आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि. 7 - भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अनेक विक्रमांची नोंद झाली आहे. या कसोटीत गोलंदाजांचा दबदबा दिसून आला. त्यामुळे यातील अनेक विक्रम गोलंदाजांच्या नावावर नोंदले गेले आहेत. त्यातच या कसोटीत तब्बल 115 वर्षांनंतर एका विक्रमाची पुनरावृत्ती झाली आहे. एकाच कसोटीत चारही डावात गोलंजाजांनी सहा किंवा त्यापेक्षा अधिक बळी टिपण्याच्या विक्रम आज नोंदवला गेला. 1902 नंतर असा अनोखा विक्रम पहिल्यांदाच नोंदवला गेला आहे.
या कसोटीत भारताच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाच्या नाथन लायनने 8 बळी टिपले. त्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ फलंदाजीस आल्यावर भारताच्या रवींद्र जडेजाने 6 बळी टिपत ऑस्ट्रेलियाला मोठी आघाडी घेण्यापासून रोखले. त्यानंतर भारताच्या दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाच्या जोश हेझलवूडने 6 विकेट घेतल्या. तर अखेरच्या डावात भारताच्या रवीचंद्रन अश्विनने सहा बळी टिपले. त्याबरोबरच 115 वर्षांनंतर क्रिकेटच्या मैदानात एका अनोख्या विक्रमाची नोंद झाली.
याआधी कसोटी क्रिकेटमध्ये चारही डावात एका गोलंदाजाने सहाहून अधिक बळी टिपण्याच्या विक्रमाची नोंद दोन वेळा झाली आहे. 1896 साली इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ओव्हलवर झालेल्या कसोटीत पहिल्यांदा असा विक्रम नोंदवला गेला. त्यानंतर 1902 साली मेलबर्नमध्ये झालेल्या या विक्रमाची पुनरावृत्ती झाली होती. आता 115 वर्षांनंतर बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर या विक्रमाची पुनरावृत्ती झाली.
दरम्यान, पुणे कसोटीत ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या दारुण पराभवाची भारताने आज सव्याज परतफेड केली. रविचंद्रन अश्विनने टिपलेले सहा बळी आणि त्याला उमेश यादव आणि रवींद्र जडेजाकडून मिळालेल्या सुरेख साथीच्या जोरावर भारताने बंगळुरू कसोटी ऑस्ट्रेलियावर 75 धावांनी सनसनाटी विजय मिळवला. त्याबरोबरच चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने 1-1 अशी बरोबरी साधली.