शालेय अभ्यासाचे ओझे कमी करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2018 04:11 AM2018-08-07T04:11:38+5:302018-08-07T04:11:44+5:30
देशात खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी अभ्यासाचे ५० टक्के ओझे कमी करण्याची तसेच शालेय स्तरावर खेळ हा विषय सक्तीचा करण्याची तयारी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने दाखविली आहे.
नवी दिल्ली : देशात खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी अभ्यासाचे ५० टक्के ओझे कमी करण्याची तसेच शालेय स्तरावर खेळ हा विषय सक्तीचा करण्याची तयारी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने दाखविली आहे. पुढील शैक्षणिक सत्रापासून ही योजना राबविण्याचा मनोदय क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंग राठोड यांनी व्यक्त केला आहे.
एका कार्यक्रमात राठोड म्हणाले, ‘शिक्षणात खेळाचा समावेश नसणे ही दुर्दैवी बाब असून २०१९ पर्यंत अभ्यासक्रमातून ५० टक्के भार कमी करण्याची तसेच क्रीडा हा विषय सक्तीचा करण्याची आम्ही तयारी करीत आहोत. खेळांना नवी उभारी देण्यासाठी क्रीडा मंत्रालय सर्वंकष प्रयत्न करीत आहे. २०२२ पर्यंत खेळांवर अधिक पैसा खर्च करता यावा यासाठी साईने (बदललेले नाव- स्पोर्टस् इंडिया) आपल्या कर्मचारी संख्येत ५० टक्के कपात करावी, अशी सूचना करण्यात आली आहे.
यंदा आमच्याकडे खेळात प्राविण्य राखणाऱ्या २० शाळा असतील. सरकार प्रत्येक शाळेवर सात ते दहा कोटी रुपये खर्च करणार आहे. प्रत्येक शाळेत दोन अथवा तीन मुख्य खेळ ठेवण्यात येतील. याच खेळांवर त्यांना शंभर टक्के लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. २०१९ च्या रग्बी विश्वचषकाचे भारतात स्वागतप्रसंगी राठोड यांनी चषकाचे अनावरण देखील केले.
>सट्टेबाजीला मान्यता देण्याचा विचार नाही
सट्टेबाजीला कायदेशीर मान्यता देण्याचा कुठलाही विचार नसल्याचे राज्यवर्धनसिंग राठोड यांनी राज्यसभेत सांगितले. विधी आयोगाने ५ जुलै रोजी दिलेल्या अहवालात खेळातील सट्टेबाजीला कायदेशीर मान्यता देणे संयुक्तिक ठरणार नसल्याचे स्पष्ट केले. सट्टेबाजी व जुगार कायदा विषय राज्यसूचीत मोडतो, असे राठोड म्हणाले.