टीएनसीएकडून सामना आयोजित करण्यास नकार
By admin | Published: January 9, 2017 12:49 AM2017-01-09T00:49:59+5:302017-01-09T00:49:59+5:30
तामिळनाडू क्रिकेट संघटनेने (टीएनसीए) इंग्लंडविरुद्ध अंडर १९ कसोटी सामने आयोजित करण्याविषयी असमर्थता दर्शवली
नवी दिल्ली : तामिळनाडू क्रिकेट संघटनेने (टीएनसीए) इंग्लंडविरुद्ध अंडर १९ कसोटी सामने आयोजित करण्याविषयी असमर्थता दर्शवली; परंतु त्यांनी मुश्ताक अली करंडक आणि विजय हजारे करंडक स्पर्धा आयोजित करण्याचे मान्य केले आहे.
टीएनसीएचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी काल बीसीसीआयकडून अपात्र ठरवण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांसोबत अनधिकृतपणे एक बैठक आयोजित केली होती. त्यामुळे हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. इंग्लंडविरुद्ध अंडर १९ मधील दोन कसोटी सामने १३ ते १६ फेब्रुवारी व २१ ते २४ फेब्रुवारी येथे चेन्नई येथे आयोजित करण्यात येणार होते.
टीएनसीएचे सदस्य आर. एन. बाबा म्हणाले, वादळामुळे मैदानाची स्थिती वाईट असल्याने आमचे टीएनसीएचे सर्व साखळी सामने अजून पूर्ण व्हायचे आहेत. त्यामुळे आम्हाला मुश्ताक अली आणि विजय हजारे करंडकादरम्यान लीग पूर्ण करायची आहे.