चुकीच्या काळात खेळल्याची खंत: अंजू बॉबी जॉर्ज, पंतप्रधान नरेंद्र मोदींची केली प्रशंसा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2023 10:13 AM2023-12-27T10:13:52+5:302023-12-27T10:15:04+5:30
जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत भारताला पहिले पदक मिळवून देणाऱ्या अंजू बॉबी जॉर्जने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशंसा केली.
नवी दिल्ली : ‘देशात खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने अनेक कौतुकास्पद कार्य केले असून, याचा सकारात्मक परिणाम आपल्याला गेल्या काही वर्षांत पाहण्यास मिळाला. त्यामुळे मला मी चुकीच्या काळात खेळल्याची खंत आहे,’ असे व्यक्त होत जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत भारताला पहिले पदक मिळवून देणाऱ्या अंजू बॉबी जॉर्जने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशंसा केली.
पंतप्रधानांच्या निवासस्थानी नाताळनिमित्त आयोजित एका कार्यक्रमादरम्यान लांब उडीतील या दिग्गज खेळाडूने म्हटले की, ‘खेळाडू म्हणून मी जवळपास २५ वर्षे मैदानावर घाम गाळला आणि या दरम्यान अनेक बदल पाहिले. २० वर्षांपूर्वी जेव्हा मी देशाला पहिले जागतिक पदक मिळवून दिले होते, तेव्हा मला माझ्या विभागाकडूनही बढती मिळाली नव्हती, पण आज नीरज चोप्राच्या पदक विजयानंतरचे अनेक बदल मी पाहतेय. ज्या प्रकारे आपण जल्लोष करतोय, त्याचा मला हेवा वाटतो. कारण मी चुकीच्या काळात खेळत होती.’
अंजूने पुढे म्हटले की, ‘महिला सशक्तीकरण आता केवळ एक शब्द म्हणून राहिला नाही. प्रत्येक भारतीय मुलगी स्वप्न पाहू लागली असून, त्यांना आपली स्वप्न साकार होण्याचा विश्वासही मिळू लागला आहे.’