रीथने दिमाखात पटकावले महिला गटाचे जेतेपद; राज्य टे. टे. ; कॅडेट गटात पार्थचे वर्चस्व
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2021 05:53 AM2021-01-25T05:53:21+5:302021-01-25T05:53:36+5:30
त्याआधी दिव्याने अनुभवी मधुरिका पाटकर हिचे तगडे आव्हान ९-११, ११-९, ८-११, ११-७, ११-६, ११-६ असे परतावून दिमाखात अंतिम फेरी गाठली होती
मुंबई : रीथ रिष्या हिने अंतिम सामन्यात झुंजार खेळाचे प्रदर्शन करत ८२व्या महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेच्या महिला गटाचे जेतेपद पटकावले. दुसरीकडे, मुंबई शहरच्या पार्थ मगर मुलांच्या कॅडेट गटाचे जेतेपद उंचावले.
मुंबई उपनगर जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या वतीने विलेपार्ले येथील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलामध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत महिला गटातील अंतिम सामना चुरशीचा रंगला. सहा गेमपर्यंत रंगलेल्या अत्यंत अटीतटीच्या सामन्यात रीथने दिव्या देशपांडेचे कडवे आव्हान ११-९, १०-१२, ११-५, ११-९, १२-१४, ११-९ असे परतावले आणि दिमाखात विजेतेपदावर नाव कोरले.
त्याआधी दिव्याने अनुभवी मधुरिका पाटकर हिचे तगडे आव्हान ९-११, ११-९, ८-११, ११-७, ११-६, ११-६ असे परतावून दिमाखात अंतिम फेरी गाठली होती. सामना 2-2 असा बरोबरीत आल्यानंतर दिव्याने सलग तीन गेम जिंकताना मधुरिकाचे आव्हान संपुष्टात आणले. रीथने उपांत्य सामन्यात विधी शाहचा ११-९, ११-२, ११-९, ११-४ असा सहज पराभव करत आगेकूच केली होती. दुसरीकडे, मुलांच्या कॅडेट गटात पार्थने झुंजार खेळ केला. पहिला गेम गमावल्यानंतर पार्थने जबरदस्त पुनरागमन करत पुण्याच्या शौरेन सोमन याचे आव्हान ९-११, १५-१३, ११-९, १२-१०, ८-११, ११-६ असे परतावले. पुण्याच्याच इशान खांडेकर याने तिसरे स्थान पटकावताना ठाण्याच्या ध्रुव वसईकर याला १२-१०, ११-७, ११-९ असे पराभूत केले.