पाकिस्तानला दिलासा
By admin | Published: March 5, 2016 02:57 AM2016-03-05T02:57:57+5:302016-03-05T02:57:57+5:30
आशिया चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेची केवळ औपचारिकता बनून राहिलेल्या शेवटच्या साखळी सामन्यात पाकिस्तानने श्रीलंकेवर सहा विकेटसनी विजय मिळवला.
मीरपूर : आशिया चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेची केवळ औपचारिकता बनून राहिलेल्या शेवटच्या साखळी सामन्यात पाकिस्तानने श्रीलंकेवर सहा विकेटसनी विजय मिळवला. स्पर्धेतील कचखाउ कामगिरीमुळे चाहत्यांच्या रोषाला बळी पडलेल्या पाकिस्तानी संघाला या विजयामुळे थोडा दिलासा मिळाला असेल. प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेला १५0 धावांत रोखणाऱ्या पाकिस्तानने हे आव्हान १९.२ षटकांत चार गड्यांच्या मोबदल्यात पार केले. उमर अकमला सामनावीरचा पुरस्कार देण्यात आला.
उभय संघ अंतिम फेरी गाठण्याच्या शर्यतीतून यापूर्वीच बाहेर गेले आहेत. रविवारी भारत आणि बांगलादेश संघांदरम्यान जेतेपदासाठी अंतिम झुंज रंगणार आहे.
आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या पाकिस्तानची सुरवात डळमळीत झाली. सलामीवीर मोहम्मद हाफीज १४ धावांवर बाद झाला. पण यानंतर शेर्जील खान (३१) आणि सर्फराज अहमद (३८) यांनी लंकेच्या गोलंदाजांना दाद लागू दिली नाही. हे दोघे बाद झाल्यावर उमर अकमल आणि शोएब मलिक यांनी ३७ चेंडूत ५६ धावांची भागीदारी करुन विजय आवाक्यात आणला. उमरने ३७ चेंडूत ४८ धावा करताना ४ चौकार आणि २ षटकार मारले. धावसंख्येची बरोबरी करुन उमर तंबूत परतला. मलिकने विजयी धाव घेतली.
तत्पूर्वी, तिलकरत्ने दिलशानची (नाबाद ७५) शानदार खेळी व त्याने कर्णधार दिनेश चांदीमलसोबत (५८) सलामीला केलेल्या ११० धावांच्या भागीदारीच्या जोरावर श्रीलंकेने पाकिस्तानविरुद्ध शुक्रवारी ४ बाद १५० धावांची आव्हानात्मक मजल मारली होती. दिलशानने ५६ चेंडूंना सामोरे जाताना नाबाद ७५ धावा फटकावल्या. त्यात १० चौकार व १ षटकाराचा समावेश आहे. चांदीमलने ४९ चेंडूंमध्ये ७ चौकार व १ षटकार ठोकला. या दोन्ही अनुभवी फलंदाजांनी १४.१ षटकांत ११० धावांची भागीदारी करीत संघाला चांगली सुरुवात करून दिली.