ऐतिहासिक कामगिरीची नामी संधी
By admin | Published: July 27, 2016 03:53 AM2016-07-27T03:53:36+5:302016-07-27T03:53:36+5:30
रिओ आॅलिम्पिकमध्ये ११ आॅगस्ट हा ऐतिहासिक दिवस ठरेल. तब्बल ११२ वर्षांनंतर आॅलिम्पिकमध्ये पुनरागमन करणाऱ्या ‘गोल्फ’ खेळाची रंगत या दिवसापासून रंगेल.
- रोहित नाईक, मुंबई
रिओ आॅलिम्पिकमध्ये ११ आॅगस्ट हा ऐतिहासिक दिवस ठरेल. तब्बल ११२ वर्षांनंतर आॅलिम्पिकमध्ये पुनरागमन करणाऱ्या ‘गोल्फ’ खेळाची रंगत या दिवसापासून रंगेल. भारताचाही या खेळामध्ये सहभाग असून अनिर्बान लाहिरी, शिवशंकर प्रसाद चौरासिया आणि आदिती अशोक असे तीन खेळाडू आॅलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करतील. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर छाप पाडलेल्या या तिन्ही खेळाडूंना पदकाची संधी असल्याने तिघांनीही सकारात्मक खेळ केला, तर निश्चितच भारताची ऐतिहासिक कामगिरी यंदाच्या आॅलिम्पिकमध्ये होईल. तसंही या तिघांनी आॅलिम्पिक प्रवेश करूनच इतिहास नोंदवला आहे. त्यामुळेच गोल्फकडे भारतीयांचे विशेष लक्ष असेल.
आशिया खंडातील अव्वल खेळाडू असलेला अनिर्बान लाहिरी याच्यावर भारताची मुख्य मदार असेल. सुरुवातीला वडील डॉ. तुषार लाहिरी यांच्या मार्गदर्शनाखाली गोल्फचे धडे गिरवलेल्या अनिर्बानने लवकरच यामध्ये जम बसवला. सध्या जागतिक क्रमवारीत ६२व्या स्थानी असलेल्या अनिर्बानने आतापर्यंत ३३ व्या क्रमांकापर्यंत झेप मारली आहे. दखल घेण्याची बाब म्हणजे अनिर्बानने ७ आंतरराष्ट्रीय विजेतेपदे पटकावली आहेत. त्यामुळेच भारताकडून पदकासाठी तो प्रबळ दावेदार आहे. २०१५ साली त्याने कमाल करताना युरोपियन टूरमध्ये दोन विजय मिळवत पीजीए चॅम्पियनशिपमध्ये ५व्या क्रमांकावर कब्जा केला होता. विशेष म्हणजे कोणत्याही भारतीय गोल्फरने आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेली ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. त्याचबरोबर गतवर्षी त्याने प्रेसिडंट कपमध्ये आंतरराष्ट्रीय संघात प्रवेश करणारा पहिला भारतीय म्हणूनही विक्रम नोंदवला.
दुसरीकडे अनिर्बनचा सहकारी असलेल्या शिवशंकर चौरासियानेही चार आंतरराष्ट्रीय विजेतेपदे पटकावताना स्वत:ला सिद्ध केले आहे. दखल घेण्याची बाब म्हणजे आंतरराष्ट्रीय गोल्फ संघटनेच्या (आयजीएफ) क्रमवारीनुसार भारत अशा २४ देशांपैकी एक आहे, ज्यांचे एकाहून अधिक खेळाडू आॅलिम्पिकमध्ये गोल्फ खेळतील. शिवाय रिओ स्पर्धेत एकूण १७ आशियाई गोल्फर खेळणार असून, त्यातील ३ भारतीय आहेत. १९९८ साली वयाच्या १९व्या वर्षी व्यावसायिक खेळाडू बनलेल्या चौरासियाने देशांतर्गत स्पर्धेत वर्चस्व मिळवताना आतापर्यंत ८ विजेतेपदे पटकावली आहेत. नुकत्याच झालेल्या इंडियन ओपन स्पर्धेत बाजी मारताना त्याने अनिर्बान, जेऊंगहु वांग (कोरिया) आणि आदिलसन डा सिल्वा (ब्राझील) या कसलेल्या खेळाडूंना मागे टाकण्याचा पराक्रम केला. त्यामुळे चौरासिया देखील इतिहास नोंदवण्याची क्षमता राखून आहे. त्याचप्रमाणे २००८ साली इंडियन मास्टर्स स्पर्धेत बाजी मारून चौरासियाने युरोपियन टूर जिंकणारा जीव मिल्खा सिंग व अर्जुन अटवाल यांच्यानंतरचा तिसरा खेळाडू म्हणून मान मिळवला. अनिर्बान आणि चौरासिया एकाच वेळी बहरले तर निश्चितच भारताला पदकापासून कोणीही रोखू शकणार नाही.
आदिती अशोक..
महिला गटात आदिती अशोकच्या रूपाने एकमेव भारतीय आव्हान असेल. विशेष म्हणजे ती भारताची मुख्य स्पर्धक म्हणून स्पर्धेत सहभागी होईल. आयजीएफ जागतिक नामांकन स्पर्धेत अव्वल ६० खेळाडूंमध्ये जागा निश्चित करताना आदितीने थेट रिओ पात्रता मिळवली.
जुलै २०१६ पर्यंत आदिती जागतिक क्रमवारीत ५७ व्या स्थानी होती. गेल्या वर्षी जूनमध्ये वयाच्या १७व्या वर्षी आदितीने मोरोक्कोमध्ये महिला युरोपियन टूरमध्ये लल्ला इचा टूर स्कूल जेतेपद पटकावले. विशेष म्हणजे अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय ठरली होती. यानंतर आशियाई युवा स्पर्धेत सहभागी होताना तिने सर्वांचेच लक्ष वेधले. सातत्यपूर्ण कामगिरी करताना आदितीने १२ प्रोफेशनल स्पर्धेत ११ कट्स मिळवले.
दखल घेण्याची बाब म्हणजे आदितीने बहुतेक स्पर्धा आपल्याहून वयाने आणि अनुभवाने मोठे असलेल्या खेळाडूंसह खेळल्या. त्यामुळे तिच्याकडे अनुभवाची कोणतीही कमतरता नसून महिला गोल्फ पदकासाठी ती प्रबळ दावेदार आहे. ३ वेळा राष्ट्रीय ज्युनिअर खेळाडू ठरलेल्या आदितीने सर्वोत्कृष्ट आशिया खेळाडूचाही मान मिळवला आहे.