लोढा समितीचा अहवाल आज सादर
By admin | Published: January 4, 2016 03:02 AM2016-01-04T03:02:40+5:302016-01-04T03:02:40+5:30
आपली प्रतिमा सुधारण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) न्यायमूर्ती लोढा समितीच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.
नवी दिल्ली : आपली प्रतिमा सुधारण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) न्यायमूर्ती लोढा समितीच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. हा अहवाल सोमवारी जाहीर होणार असून यामध्ये बोर्डाला सुधारक पाऊल उचलण्याची सूचना करण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
न्यायमूर्ती (सेवानिवृत्त) आर.एम. लोढा, न्यायमूर्ती (सेवानिवृत्त) अशोक भान व न्यायमूर्ती (सेवानिवृत्त) आर.व्ही. रवींद्रन यांचा समावेश असलेली तीन सदस्यांची समिती सर्वोच्च न्यायालयाला आपला अहवाल सादर करण्यास सज्ज आहे. सर्वोच्च न्यायालय या शिफारशी लागू करण्याचे बंधन घालणार की नाही, याकडे बीसीसीआयचे लक्ष असेल. राजकीय पुढाऱ्यांचा बोर्डामध्ये सहभाग नसावा, अशी शिफारस समितीतर्फे होण्याची शक्यता आहे. सर्व कार्यकारी पदाधिकारी मानद अधिकारी आहेत.
त्यात अव्वल राज्य संघटनांचे संचालन राजकीय पुढारी, मोठे उद्योगपती किंवा प्रशासकीय अधिकारी करीत आहेत. बंगाल क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि मुंबई क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष दिलीप वेंगसरकर यांचा अपवाद वगळता एकही आघाडीचा क्रिकेटपटू राज्य संघटनेमध्ये मोठ्या पदावर नाही. (वृत्तसंस्था)