निवड चाचणीत रेश्माला डावलले; साक्षी मलिकला थेट प्रवेश दिला जाणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2018 06:36 AM2018-06-06T06:36:26+5:302018-06-06T06:36:26+5:30
जाकार्ता (इंडोनेशिया) येथे आॅगस्टमध्ये होणाऱ्या आशियाड स्पर्धेसाठी भारतीय महिला संघाच्या निवड चाचणीत कुस्ती महासंघाने अचानक निकष बदलून कोल्हापूरची कुस्तीपटू रेश्मा माने हिला ६२ ऐवजी ६८ किलो गटातून चाचणी देण्यास भाग पाडले आहे.
- सचिन भोसले
कोल्हापूर : जाकार्ता (इंडोनेशिया) येथे आॅगस्टमध्ये होणाऱ्या आशियाड स्पर्धेसाठी भारतीय महिला संघाच्या निवड चाचणीत कुस्ती महासंघाने अचानक निकष बदलून कोल्हापूरची कुस्तीपटू रेश्मा माने हिला ६२ ऐवजी ६८ किलो गटातून चाचणी देण्यास भाग पाडले आहे. आॅलिम्पीक रौप्यपदक विजेती मल्ल साक्षी मलिकला ६२ किलोगटात निवड चाचणी डावलून थेट स्पर्धेत प्रवेश देण्यासाठी हे निकष बदलेले असून त्यामुळे पुन्हा एकदा कुस्ती महासंघ उत्तरेतील स्टार कुस्तीगीरांवरच मेहरबान असल्याचे स्पष्ट झाले आहे.
लखनौ येथील ‘स्पोर्टस आॅथॉरिटी आॅफ इंडिया’च्या (साई) कुस्ती संकुलात आशियाड स्पर्धेसाठी निवड चाचणी शिबिर सुरू आहे. त्यात कोल्हापूरची महिला कुस्तीगीर रेश्मा माने हिची ६२ किलोगटाच्या चाचणी शिबिरासाठी निवड झाली आहे. मात्र याच गटात आॅलिम्पिकवीर साक्षीसुद्धा सहभागी झाली होती. या स्पर्धेत प्रवेशासाठी १० जूनला निवड चाचणी होणे क्रमप्राप्त होते. मात्र साक्षीने कुस्ती महासंघाला थेट स्पर्धेसाठी प्रवेश द्यावा, म्हणून मागणी केली होती. त्यानुसार भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष खासदार बृजभूषण शरण सिंग आणि कुस्ती महासंघाचे सचिव विनोद तोमर यांनी ही विनंती मान्य करीत तिची थेट निवड केली. तिच्यासह आॅलिम्पिक विजेता सुशीलकुमार (७४ किलो), राष्ट्रकुल विजेता बजरंग पुनिया (६१ किलो), विनेश फोगट (४८ किलो) यांचीही निवड करण्यात आली आहे. ही बाब सोमवारी अचानकपणे जाहीर करण्यात आली.
यामुळे ६२ किलोगटातील प्रमुख दावेदार असलेल्या रेश्माला एक तर १० जूनला होणाºया निवड चाचणीपुर्वी चार किलो वजन घटवून ५८ किलो किंवा ६८ किलोगटात चाचणी द्यावी लागणार. वजन घटविणे किंवा वाढविण्याची किमया चार दिवसांत अशक्य आहे. त्यामुळे रेश्माला या स्पर्धेसाठी मुकावे लागणार, हे निश्चित आहे. तिच्यासह २० हून अधिक महिला मल्लांवरही अशीच परिस्थिती ओढवली आहे. त्यामुळे या स्टार मल्लांची थेट निवड करायची होती, तर अन्य मल्लांना महिनाभर शिबिरासाठी दिल्ली, लखनौ येथे का बोलावले असा प्रश्न विचारला जात आहे. या अन्यायाबद्दल आवाज उठविला तर पुढील स्पर्धांना मुकावे लागण्याची भीती असल्याने अनेक मल्लांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत आहे.
- रेश्मा माने हिच्या ६२ किलोगटामध्ये दिव्या काकर, नवज्योत कौर, गीता फोगट, दीपिका जाखर, शिल्पा यादव (सुशीलकुमारची पत्नी), पूजा, बोनिया, किरण अशा २० हून अधिक महिला मल्ल या निवड चाचणी शिबिरात गेले महिनाभर सराव करीत होत्या. या सर्वांनाही आपला नियमित किलोगट सोडून अन्य किलोगटातून चाचणी द्यावी लागणार आहे. त्यामुळे जवळजवळ त्यांची निवड होणार नसल्याचे निश्चित मानले जात आहे.
रेश्मासह राहुल आवारेवरही अशाच पद्धतीने आशियाड निवड चाचणी अन्याय झाला आहे. केवळ उत्तरेतील मल्लांनाच कुस्ती महासंघ झुकते माप देतो. ही बाब अन्यायकारक आहे. याकडे राज्यकर्त्यांनीसुद्धा लक्ष द्यावे.
- चंद्रहार पाटील, डबल महाराष्ट्र केसरी