शेष भारत बॅकफुटवर
By admin | Published: January 22, 2017 04:31 AM2017-01-22T04:31:12+5:302017-01-22T04:31:12+5:30
कर्णधार चेतेश्वर पुजाराच्या झुंजार ८६ धावानंतरही रणजी चॅम्पियन गुजरातच्या धारदार गोलंदाजीसमोर शेष भारत संघाचा डाव उदध्वस्त झाला. दिवसाचा खेळ संपला तेव्हा त्यांचा
मुंबई : कर्णधार चेतेश्वर पुजाराच्या झुंजार ८६ धावानंतरही रणजी चॅम्पियन गुजरातच्या धारदार गोलंदाजीसमोर शेष भारत संघाचा डाव उदध्वस्त झाला. दिवसाचा खेळ संपला तेव्हा त्यांचा धावफलक ९ बाद २0६ असा ‘कुपोषित’ दिसत होता. गुजरातने काल शुक्रवारी प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात ३५८ धावा केल्या होत्या.
शेष भारतचा सलामीवीर अभिनव मुकुंद चिंतन गजाच्या गोलंदाजीवर त्रिफळाचित झाल्यानंतर पुजारा फलंदाजीस आला. त्याने आल्यापासून एक बाजू लावून धरत धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला परंतु दुसऱ्या बाजूकडून त्याला चांगली साथ मिळाली नाही. बाद होणारा तो सातवा फलंदाज ठरला. १५६ चेंडू खेळताना त्याने ९ चौकाराच्या सहाय्याने ८६ धावा केल्या. ईश्वर चौधरीच्या शॉर्टबॉलवर तो यष्टीरक्षकाकडे झेल देवून परतला.
शेष भारतची धावसंख्या १९१ असताना तीन बळी पडले. पुजारा याच्याशिवाय कुलदीपसिंह आणि शाहबाज नदीमही याच धावसंख्येवर बाद झाले. त्यानंतर एका धावेची भर घालून नववा गडी बाद झाला, त्यामुळे त्यांची धावसंख्या ३ बाद १६६ वरुन ९ बाद १९२ अशी झाली. पुजारा याच्याशिवाय मुंबईकर अखिल हेरवाडकर याने थोडाफार संयम दाखवला. १२४ मिनिटात तो एक षटकार आणि सात चौकारासह ४८ धावा करुन बाद झाला. गुजरातकडून हार्दिक पटेलने आणि चिंतन गजाने प्रत्येकी तीन तर मोहित थडानीने दोन बळी घेतले.
तत्पूर्वी, सकाळच्या सत्रात आपल्या ८ बाद ३00 धावावरुन पुढे खेळताना गुजरातने ७५ मिनिटात ५८ धावा जोडल्या. शतकवीर चिराग गांधीने ३३ धावांची भर टाकून १६९ धावा केल्या. सिध्दार्थ कौलने त्याचा त्रिफळा उडवला. (वृत्तसंस्था)
संक्षिप्त धावफलक
गुजरात पहिला डाव : १0२.५ षटकात सर्वबाद ३५८ धावा (चिराग गांधी १६९, मनप्रीत जुनेजा ४७; सिध्दार्थ कौल ५/८६, पंकज सिंग ४/१0४).
शेष भारत पहिला डाव : ७२ षटकांत ९ बाद २0६ धावा. (अखिल हेरवाडकर ४८, चेतेश्वर पुजारा ८६; चिंतन गजा ४/४३, हार्दिक पटेल ३/७३.)