कर्नाटकसमोर शेष भारत ‘ढेर’

By admin | Published: March 21, 2015 01:18 AM2015-03-21T01:18:43+5:302015-03-21T01:18:43+5:30

मनिष पांड्येचे शानदार नाबाद शतक आणि श्रेयश गोपालने घेतलेली फिरकी याजोरावर बलाढ्य कर्नाटकने सलग दुसऱ्यांदा इराणी ट्रॉफीवर कब्जा करताना शेष भारताचा २४६ धावांनी धुव्वा उडवला.

The rest of India 'pile' before Karnataka | कर्नाटकसमोर शेष भारत ‘ढेर’

कर्नाटकसमोर शेष भारत ‘ढेर’

Next

इराणी ट्रॉफी: निर्णायक शतक झळकावणारा मनिष पांड्ये ठरला सामनावीर
बंगळुरु: मनिष पांड्येचे शानदार नाबाद शतक आणि श्रेयश गोपालने घेतलेली फिरकी याजोरावर बलाढ्य कर्नाटकने सलग दुसऱ्यांदा इराणी ट्रॉफीवर कब्जा करताना शेष भारताचा २४६ धावांनी धुव्वा उडवला. कर्नाटकने एकूण सहाव्यांदा हे विजेतेपद पटकावताना विजयी ‘षटकार’ देखील नोंदवला.
सामनावीर ठरलेल्या पांंड्येने १६४ चेंडुमध्ये १२ चौकार व ३ षटकारांची आतषबाजी करताना नाबाद १२३ धावा कुटत कर्नाटकला दुसऱ्या डावात ४२२ धावांची मजल मारुन दिली आणि शेष भारताला विजयासाठी ४०३ धावांचे कठीण आव्हान दिले. या अशक्यप्राय आव्हानाचा पाठलाग करताना अडखळती सुरुवात झालेल्या शेष भारताचा डाव ४३.३ षटकांत अवघ्या १५६ धावांत संपुष्टात आला. केदार जाधवने एकाकी झुंज देताना संयमी ५६ धावा फटकावल्या. परंतु दुसऱ्या बाजूला एकही फलंदाज कर्नाटकच्या माऱ्यासमोर न टिकल्याने शेष भारताचा पराभव झाला.
फिरकीपटू गोपालने अचूक मारा करत ३९ धावांत ४ बळी घेत शेष भारताच्या फलंदाजांना नाचवले. अभिमन्यू मिथूनने देखील त्याला चांगली साथ देताना ४० धावांत ३ बळी घेतले. एस. अरविंद आणि एच. शरथ यांना प्रत्येकी एक बळी घेण्यात यश आले.
चौथ्या दिवशी ६ बाद ३४१ या धावसंख्येवरुन सुरुवात करताना कर्नाटकने पांड्येच्या जोरावर ४००चा पल्ला पार केला. कर्णधार विनय कुमार (३८) ने छोटेखानी खेळी केली. पहिल्या डावात अपयशी ठरलेल्या मुंबईकर शार्दुल ठाकूरने आपला जलवा दाखवताना दुसऱ्या डावात कर्नाटकचा अर्धा संघ ८६ धावांत गारद केला. वरुण अ‍ॅरोन आणि प्रग्यान ओझा यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.
भल्यामोठ्या धावांचा पाठलाग करताना शेष भारताचा डाव सुरुवातीपासूनच गडगडला. शरथ आणि मिथून यांनी शेष भारताच्या आघाडीच्या फळीला जबरदस्त धक्के देत त्यांची सुरुवातीलाच ३ बाद ८ अशी केविलवाणी अवस्था केली. यानंतर जीवनज्योत सिंग (३८) आणि कर्णधार मनोज तिवारी (२४) यांनी चौथ्या विकेट्साठी ५५ धावांची भागीदारी केली. मात्र हे दोघेही पाठोपाठ बाद झाल्याने शेष भारतची ५ बाद ६५ अशा अवस्था झाली. यानंतर केदारने आक्रमक अर्धशतक झळकावताना शेष भारताला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र दुसऱ्या बाजूने योग्य साथ न लाभल्याने त्यांचा डाव १५६ धावांत आटोपला. (वृत्तसंस्था)

संक्षिप्त धावफल:
कर्नाटक (पहिला डाव):
सर्वबाद २४४ धावा.
शेष भारत (पहिला डाव):
सर्वबाद २६४ धावा
कर्नाटक (दुसरा डाव): समर्थ त्रि. गो. ठाकूर ८१, अगरवाल झे. जाधव गो. अ‍ॅरोन २८, रेड्डी पायचीत गो. ओझा ३१, उथप्पा त्रि. गो. अ‍ॅरोन ६, नायर पायचीत गो. ओझा ८०, पांड्ये नाबाद १२३, गोपाल झे. नमन गो. गो. धवन ०, विनय झे. नमन गो. ठाकूर ३८, मिथून त्रि. गो. ठाकूर १०, अरविंद पायचीत गो. ठाकूर ४, शरथ झे.डोग्रा गो. ठाकूर ५. अवांतर - १६. एकूण: ११०.३ षटकांत सर्वबाद ४२२ धावा.

गोलंदाजी: धवन २१-१-७४-१; अ‍ॅरोन २७-४-१३१-२; ठाकूर २९.३-६-८६-५; ओझा २८-३-१००-२; जाधव ४-०-१६-०; तिवारी १-०-६-०.
शेष भारत (दुसरा डाव): जीवनज्योती झे. रेड्डी गो. शरथ ३८, चंद झे. उथप्पा गो. मिथून १, डोग्रा त्रि. गो. मिथून ०, ओझा झे. उथप्पा गो. मिथून ०, तिवारी गो. अरविंद २४, जाधव झे. रेड्डी गो. गोपाल ५६, यादव पायचीत गो. गोपाल १०, धवन पायचीत गो. गोपाल १०, ठाकूर त्रि. गो. गोपाल ५, अ‍ॅरोन नाबाद १०, ओझा धावबाद ०. अवांतर - २. एकूण: ४३.३ षटकांत सर्वबाद १५६ धावा.
गोलंदाजी: विनय १२-२-३४-०; मिथून १०-२-४०-३; शरथ ६-१-१६-१; अरविंद ९.३-३-२५-१; गोपाल ६-०-३९-४.

या विजेतेपदासह सलग तीन राष्ट्रीय विजेतेपद पटकावण्याचा अनोखा विक्रम करताना यंदा कर्नाटकने विजेतेपदांची ‘हॅट्ट्रीक’ नोंदवली. इराणी ट्रॉफी अगोदर कर्नाटकने यंदाच्या रणजी ट्रॉफी व विजय हजारे एकदिवसीय स्पर्धेचे विजेतेपद देखील राखले आहे.

शेष भारतचा अर्धा संघ ६५ धवांत परतल्यानंतर त्यांचा उरल्या सुरल्या आशा अवलंबून होत्या त्या महाराष्ट्राच्या केदार जाधववर. केदारने एकाकी झुंज देत सहजासहजी हार पत्करणार नसल्याचा इशारा देत आक्रमक प्रतित्त्युर दिले. केदारने ४८ चेंडूत ६ चौकार व ३ षटकारांची आतषबाजी करीत ५६ धावा काढल्या. त्याने सहाव्या गडीसाठी जयंत जाधव सोबत ४८ धावा रचल्या, ज्यात केदारचा वाटा ३८ धावांचा होता.

Web Title: The rest of India 'pile' before Karnataka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.