वनपर्यटनावर होणार परिणाम
By admin | Published: October 13, 2016 01:43 AM2016-10-13T01:43:23+5:302016-10-13T01:43:23+5:30
नागझिरा-नवेगाव व्याघ्र प्रकल्पात सध्याच्या घडीला एकही वाघ नाही. त्यामुळे वनपर्यटक ज्या वाघाच्या दर्शनासाठी उत्साहाने येतात त्यांची निराशा होत आहे.
आॅनलाईन बुकिंग सुरू : व्याघ्र प्रकल्पात वाघाचेच दर्शन दुर्लभ
गोंदिया : नागझिरा-नवेगाव व्याघ्र प्रकल्पात सध्याच्या घडीला एकही वाघ नाही. त्यामुळे वनपर्यटक ज्या वाघाच्या दर्शनासाठी उत्साहाने येतात त्यांची निराशा होत आहे. यातून येथील वनपर्यटन कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ‘जय’सारखा आकर्षक वाघ गायब झाल्यानंतर तर वाघांनीही वाघिणीच्या शोधात येथून काढता पाय घेतला आहे. मात्र वन्यजीव विभाग या जंगलात वाघांचे पुनरागमन होण्यासाठी आशादायी आहे.
महसूल व वन मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार १२ डिसेंबर २०१३ मध्ये नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र घोषित करण्यात आले. १ आॅक्टोबर ते १५ जूनपर्यंत हे वनक्षेत्र पर्यटनासाठी खुले करण्यात येते. यात नागझिरा अभयारण्य, नवीन नागझिरा अभयारण्य, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नवेगाव अभयारण्य व कोका अभयारण्याचा समावेश करण्यात आला. तेव्हापासून येथे पर्यटकांच्या सुविधांमध्ये वाढ झाली आहे. पर्यटकांची संख्यासुद्धा वाढू लागली व वन-वन्यजीव विभागाला पैशाचीही आवक होत आहे. यावर्षीही १ आॅक्टोबरपासून राबविण्यात आलेल्या वन्यजीव सप्ताहानंतर हे क्षेत्र वनपर्यटनासाठी खुले करण्यात आले आहे.
गोंदिया वन्यजीव विभागाची निर्मिती पूर्वीच्या वन्यजीव विभाग भंडारा व नागपूरमधून सन १९९६ मध्ये झाली. गोंदियात सन १९९९ पासून कार्यालय कार्यरत झाले. या विभागाची श्रेणीवाढ होवून सन ११ नोव्हेंबर २०११ पासून वनसंरक्षक दर्जाचे अधिकारी येथे कार्यरत आहेत.
नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात पर्यटनासाठी आॅनलाईन बुकिंग सध्या सुरू आहे. आॅफलाईन बुकिंग १६ आॅक्टोबरपासून सुरू होणार असल्याचे विभागीय वनाधिकारी (वन्यजीव) एस.एस. कातुरे यांनी सांगितले. त्यांच्या सांगण्यानुसार, सध्या पाऊस आल्यामुळे व्याघ्र प्रकल्पातील रस्ते योग्य नाहीत. त्यामुळे वाहन तेथे जात नाहीत. मात्र दोन-तीन दिवसांत वाहन जावू शकतील, अशी रस्त्यांची स्थिती होईल. (प्रतिनिधी)
- तंबू निवासातून रोजगाराच्या संधी