रिकी, शहान यांना पोल पोझिशन
By admin | Published: September 25, 2016 05:09 AM2016-09-25T05:09:04+5:302016-09-25T05:09:04+5:30
येथे होत असलेल्या तेराव्या जे. के. टायर-एफएमएससीआय राष्ट्रीय रोटेक्स मॅक्स कार्टिंग स्पर्धेच्या पाचव्या अणि अंतिम फेरीसाठी रिकी डोनीसनने सिनिअर मॅक्स गटात तर
कोल्हापूर : येथे होत असलेल्या तेराव्या जे. के. टायर-एफएमएससीआय राष्ट्रीय रोटेक्स मॅक्स कार्टिंग स्पर्धेच्या पाचव्या अणि अंतिम फेरीसाठी रिकी डोनीसनने सिनिअर मॅक्स गटात तर शहान अली मोहसिन याने मायक्रो मॅक्स गटात शनिवारी पोल पोझिशन मिळवली. त्यांच्या दमदार कामगिरीमुळे आज, रविवारी होणाऱ्या अंतिम फेरीतील विजेतेपदाचे दावेदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे.
हुपरी रोडवरील मोहितेज रेसिंगच्या टॅ्रकवर स्पर्धेच्या अंतिम व पाचव्या फेरीसाठी शनिवारी पात्रता फेरी झाली. सीनिअर मॅक्स गटात पहिल्या हिटमध्ये बीपीसीच्या रिकी डोनीसनने पहिल्या स्थानावर असलेल्या विष्णू प्रसादला मागे टाकत प्रथम स्थान पटकावले. कोल्हापूरच्या ध्रुव मोहितेने जोरदार मुसंडी मारत द्वितीय स्थानावर आगेकूच केली. त्यामुळे विष्णू प्रसाद तिसऱ्या स्थानावर ढकलला गेला. दुसऱ्या हिटमध्ये रिकी डोनीसनने प्रथम, नयन चॅटर्जीने द्वितीय व ध्रुव मोहितेने तृतीय स्थानी बाजी मारली. दुसऱ्या हिटमध्ये प्रसाद मागे पडला. ध्रुवला स्थानिक क्रीडारसिकांचा मोठा पाठिंबा लाभला. क्षणोक्षणी त्याला ओरडून प्रोत्साहन दिले जात होते.
मायक्रो मॅक्स गटातील आशियाई विजेता चालक शहान अली याने अपेक्षेप्रमाणे दोन्ही हिटमध्ये प्रथम स्थान राखले, तर पहिल्या हिटमध्ये आदित्यांशने द्वितीय व अर्जुन नायरने तृतीय स्थान पटकावले. मात्र, दुसऱ्या हिटमध्ये अर्जुन नायरने शाहीनबरोबर जोरदार टक्कर देत द्वितीय स्थान पटकावले, तर पहिल्या हिटमध्ये द्वितीय स्थानावर असलेल्या आदित्यांशला तिसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले. या गटातही अंतिम फेरीत मोठी चुरस पाहण्यास मिळणार आहे.
ज्युनिअर मॅक्स गटात बंगरुळच्या चिराग घोरपडेने अनपेक्षितपणे चांगली चुणूक दाखवत आगेकूच केली. त्यानेही पहिल्या हिटमध्ये चौथ्या फेरीतील विजेता मानव शर्माला मागे टाकले. शर्मा द्वितीय, तर निर्मल उमाशंकर तृतीय स्थानी पोहोचला. दुसऱ्या हिटमध्ये स्पर्धेतील एकमेव महिला चालक मीरा ईरडा हिने उत्कृष्ट व वायूवेगाने लॅप पूर्ण करीत पहिले स्थान गाठले. द्वितीय स्थानी आदित्य स्वामीनाथन, तृतीय स्थानावर भार्गव प्रद्युम्न यांना समाधान मानावे लागले.
आजचा निकाल
सीनिअर मॅक्स : पहिली हिट -
१) रिकी डोनीसन (बंगलोर),
२) धु्रव मोहिते (कोल्हापूर),
३) विष्णू प्रसाद (चेन्नई)
दुसरी हिट - १) रिकी डोनीसन,
२) नयन चॅटर्जी, ३) ध्रुव मोहिते
ज्युनिअर मॅक्स : पहिली हिट -
१) चिराग घोरपडे, २) मानव शर्मा (फरिदाबाद), ३) निर्मल उमाशंकर (चेन्नई)
दुसरी हिट - १) मीरा र्ईरडा,
२) आदित्य स्वामीनाथन,
३) भार्गव प्रद्युम्न
मायक्रो मॅक्स : पहिली हिट -
१) शाहीन अली (बंगलोर),
२) आदित्यांश, ३) अर्जुन नायर (चेन्नई)
दुसरी हिट - १) शाहीन अली,
२) अर्जुन नायर, ३) आदित्यांश