टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा ठरल्यानुसारच होईल- किरेन रिजिजू
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2020 01:46 AM2020-02-28T01:46:20+5:302020-02-28T06:59:32+5:30
कोरोना व्हायरस चीनमध्ये आहे, टोकियोत नाही
नवी दिल्ली : ‘कोरोना संक्रमणाची जगभरात दहशत असल्यामुळे चिंता कायम आहे. तरीही यंदा टोकियो ऑलिम्पिकचे आयोजन निर्धारित वेळापत्रकानुसार होईल,’ असा विश्वास केंद्रीय क्रीडामंत्री कीरेन रिजिजू यांनी व्यक्त केला आहे. ऑलिम्पिकचे आयोजन २४ जुलैपासून टोकियो शहरात होणार आहे.
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे ज्येष्ठ सदस्य डिक पाऊंड यांनी बुधवारी भीती व्यक्त करताना, ‘कोरोनावर मे पर्यंत प्रतिबंध घालण्यात अपयश आल्यास ऑलिम्पिक रद्द करावे लागेल,’ असे वक्तव्य केले होते. रिजिजू यांनी येथे भारतीय खेळाडूंसाठी आयोजित जपानी संस्कृती आणि शिष्टाचाराच्या जागृततेसाठी आयोजित कार्यशाळेत विचारण्यात आलेल्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितले की, ‘व्हायरस चीनमध्ये आहे, टोकियोत नाही.’ संकटाचा सामना करण्यास भारताने एकजूट दाखवावी, ही काळाची गरज आहे. मला तर टोकियो ऑलिम्पिक २४ जुलै रोजी ठरल्यानुसार सुरू होण्याची आशा आहे. विश्व एका समुदायासारखे असल्यामुळे आपल्याला एक मेकांना पाठिंबा द्यायलाच हवा.’
कोरोनाने चीनमध्ये आतापर्यंत २७०० हून अधिक बळी घेतले आहेत. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार जपानमध्ये १८० हून अधिक लोकांना संक्रमणाची लागण झाली असून त्यातील तिघांचा मृत्यू झाला आहे. आॅलिम्पिकला कोरोनाचा कुठलाही धोका नसल्याचा पुनरुच्चार टोकियो आयोजन समितीने केला आहे.
भारतीय संघाच्या ऑलिम्पिक तयारीसंदर्भात विचारताच रिजिजू म्हणाले, ‘२०१६ च्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेदरम्यान खेळाडूंच्या सामनासंदर्भात झालेल्या चुकांची पुनरावृत्ती होणार नाही, याची खबरदारी घेण्यात येणार आहे. २०१६ साली व्यवस्थापन करण्यासंदर्भात काही उणिवा चव्हाट्यावर आल्या होत्या, मात्र पुन्हा ही चूक होणार नाही, याकडे गांभिर्याने लक्ष दिले जात आहे.’ (वृत्तसंस्था)
जर्मनी, पोलंडमधील पात्रता सामने स्थगित
कोरोना संक्रमणामुळे पुढील आठवड्यात सुरू होणारी जर्मन ओपन बॅडमिंटन स्पर्धा तसेच पोलिश ओपन स्पर्धा स्थगित करण्यात आली आहे. या दोन्ही ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा होत्या. ३ ते ८ मार्च या कालावधीत होणारी जर्मन ओपन स्पर्धा निर्धारित वेळेत होईलच याची खात्री नसल्याचे जागतिक बॅडमिंटन महासंघाने म्हटले आहे.
पोलिश ओपनसाठीदेखील नव्या तारखा मागविण्यात येत आहेत. आधी या स्पर्धेचे आयोजन २६ ते २९ मार्च दरम्यान होणार होते. जागतिक बॅडमिंटन महासंघ कोरोना संक्रमणाच्या व्याप्तीवर सातत्याने नजर राखून असून अधिकृत माहिती लवकरच मिळेल.
कोरियन खेळाडूंना परवानगी मिळेल?
दक्षिण कोरियाच्या राष्ट्रीय नेमबाजी संघटनेने कोरियन खेळाडूंना पुढील महिन्यात भारतात होणाऱ्या जागतिक नेमबाजी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी परवानगी मिळणार का, अशी विचारणा केली आहे. भारतीय नेमबाजी संघटनेला यासंदर्भात त्यांनी पत्र पाठवले आहे.
द. कोरियामध्येही कोरोना विषाणूमुळे अनेकांचा मृत्यू झालेला आहे. भारतीय राष्ट्रीय रायफल संघटनेचे अध्यक्ष रनिंदर सिंग यांना कोरियाच्या नेमबाजी संघटनेचे सचिव योंगजी ली यांनी पत्र पाठवले आहे. ली यांनी म्हटले आहे की,‘ कोरियाचे बहुतांश खेळाडू आयएसएसएफ जागतिक स्पर्धेत सहभागी होऊन ऑलिम्पिकसाठीचे पात्रता गुण मिळवू इच्छित आहेत. मात्र खेळाडू व अधिकाऱ्यांना भारत या स्पर्धेत त्यांना सहभागी होऊ देईल का नाही याबाबत शंका आहे. त्यामुळे याबाबतची स्थिती स्पष्ट करावी.’ अशी विनंती त्यांनी केली.