ऋषभ-संजूची वादळी फटकेबाजी
By admin | Published: May 4, 2017 11:54 PM2017-05-04T23:54:28+5:302017-05-05T01:11:20+5:30
वृषभ पंत आणि संजू सॅमसन यांच्या वादळी खेळीच्या जोरावर दिल्लीने गुजरातचा 7 विकेट्स राखून धुव्वा उडवला
फिरोझशाह कोटला स्टेडियवर झालेल्या या सामन्यात दिल्लीकरांनी चांगली सुरुवात करताना गुजरातला झटपट दोन धक्के दिले. मात्र, नंतर गुजरातचा कर्णधार सुरेश रैना व दिनेश कार्तिक यांनी गुजरातला २० षटकांत ७ बाद २०८ धावांची मजबूत मजल मारून दिली. या वेळी, दिल्लीच्या हातून हा सामना निघून गेल्याचेच चित्र दिसत होते. परंतु, सॅमसन - पंत यांंच्या जोरावर दिल्लीने १७.३ षटकांतच बाजी मारताना ३ बाद २१४ धावा केल्या.
कर्णधार करुण नायर (१२) अपयशी ठरल्यानंतर सॅमसन - पंत यांनी १४३ धावांची तुफानी भागीदारी करून दिल्लीला विजयी मार्गावर आणले. सॅमसनने ३१ चेंडंूत ७ षटकारांचा नजराणा पेश करून ६१ धावा कुटल्या. दुसरीकडे, पंतने ४३ चेंडूंत ९७ धावांची वादळी खेळी केली. विशेष म्हणजे अनुभवी रवींद्र जडेजावर हल्ला चढवताना या दोघांनी त्याला २ षटकांत २८ धावांचा चोप दिला. हे दोघे बाद झाल्यनंतर श्रेयस अय्यर व कोरी अँडरसन यांनी दिल्लीच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. पंत शतकापासून केवळ ३ धावा दूर असताना बाद झाला. तत्पूर्वी, द्वेन स्मिथ - ब्रेंडन मॅक्युलम ही आक्रमक सलामी जोडी स्वस्तात परतल्यानंतर रैनाने केलेल्या तडाखेबंद अर्धशतकाच्या जोरावर गुजरातने धावांचा डोंगर रचला.
स्मिथ (९) आणि मॅक्युलम (१) स्वस्तात परतल्याने गुजरातची दुसऱ्याच षटकात २ बाद १० धावा अशी अवस्था झाली होती. मात्र, रैनाने सगळी सूत्रे आपल्याकडे घेत चौफेर फटकेबाजी करत ४३ चेंडूत ५ चौकार व ४ षटकारांसह ७७ धावांची खेळी केली. रैनानंतर कार्तिकने आक्रमक पवित्रा घेत ३४ चेंडूंत ५ चौकार व ५ षटकारांसह ६५ धावा काढल्या. अखेरच्या काही षटकांमध्ये रवींद्र जडेजाने (७ चेंडूंत १८*) केलेल्या फटकेबाजीमुळे गुजरातने दोनशेचा पल्ला पार केला. (वृत्तसंस्था)
संक्षिप्त धावफलक
गुजरात लायन्स : २० षटकांत ७ बाद २०८ धावा : (सुरेश रैना ७७, दिनेश कार्तिक ६५; कागिसो रबाडा २/२८, २/३०) पराभूत वि. दिल्ली डेअर डेव्हिल्स : १७.३ षटकांत ३ बाद २१४ धावा (ऋषभ पंत ९७, संजू सॅमसन ६१; रवींद्र जडेजा १/२८, बासिल थम्पी १/४०, प्रदीप संगवान १/४३).