CoronaVirus: रितू फोगाट योगा, सिनेमा, पुस्तक वाचनात व्यस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 12:55 AM2020-04-23T00:55:43+5:302020-04-23T00:56:00+5:30
२०१६ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कुस्तीचे सुवर्ण विजेती रितू येथे दैनंदिन सरावानंतर पुस्तके वाचण्यात, सिनेमा पाहण्यात आणि योगा करण्यात वेळ घालवत आहे.
सिंगापूर: कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊनच्या काळात कुटुंबापासून दूर असलेली मिक्स मार्शल आर्ट फायटर रितू फोगाट मानसिक कणखरता वाढविण्यावर भर देत आहे. या ब्रेकचा वापर ती शारीरिक तंदुरुस्ती आणि मानसिक आरोग्य राखण्यासाठी करताना दिसते.
२०१६ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कुस्तीचे सुवर्ण विजेती रितू येथे दैनंदिन सरावानंतर पुस्तके वाचण्यात, सिनेमा पाहण्यात आणि योगा करण्यात वेळ घालवत आहे. महिला मल्ल ते मिक्स मार्शल आर्ट फायटर असा प्रवास करणारी रितू हिने स्वत:चा दुसरा विजय येथे फेब्रुवारीत वन चॅम्पियनशिपमध्ये नोंदवला होता. सध्या ती सिंगापूरमध्ये आहे. स्वत:चे कौशल्य उंचावण्यासाठी या ब्रेकचा वापर करण्याचे ठरवले असून त्यासाठी नित्यनेमाने दररोज साडेतीन तास शारीरिक आणि मानसिक व्यायामाचा सराव चालतो, असे रितूने सांगितले.
ती पुढे म्हणाली,‘ लॉकडाऊनमध्ये मी माझे संपूर्ण वेळापत्रक तयार केले आहे. त्यात ट्रेडमिलवर धावणे, वजन उचलणे, बॅग पंचिंग आणि दोराच्या साहाय्याने चढण्याचा सराव आदींचा समावेश आहे. यामुळे शारीरिक दम वाढतो शिवाय मानसिकरीत्या आपण कणखर होत जातो. सध्या मी योगासनाचा मोठ्या प्रमाणावर सराव करीत आहे. सिंगापूरमध्ये वास्तव्यास असल्यापासून माझा दैनंदिन सराव सुरू झाला. यामुळे पुढील स्पर्धांमध्ये विजय मिळविणे सोपे होईल, अशी आशा आहे.(वृत्तसंस्था)