रियाल माद्रिदसोबतच कारकीर्द संपविणार?
By admin | Published: November 8, 2016 03:39 AM2016-11-08T03:39:35+5:302016-11-08T03:39:35+5:30
स्टार फुटबॉलर ख्रिस्तियानो रोनाल्डो याने आपल्या रेयाल माद्रिद क्लबसह पुढील पाच वर्षांसाठी करार वाढविला आहे. विशेष म्हणजे
माद्रिद : स्टार फुटबॉलर ख्रिस्तियानो रोनाल्डो याने आपल्या रेयाल माद्रिद क्लबसह पुढील पाच वर्षांसाठी करार वाढविला आहे. विशेष म्हणजे, यासह त्याने आपल्या कारकिर्दीची सांगता रेयाल माद्रिदसोबतच करणार असल्याचे संकेत दिले आहेत. रोनाल्डो- माद्रिद यांच्यातील नव्या करारावर सोमवारी हस्ताक्षर होणार होते आणि हा करार २०२१ सालापर्यंत असेल. दरम्यान, हा करार किती रकमेचा करण्यात येणार आहे, याबाबत कमालीची गुप्तता ठेवण्यात आली आहे.
रेयाल माद्रिदने सांगितले की, ‘रोनाल्डोसह करण्यात येणाऱ्या कराराचा अधिकृत कार्यक्रम सोमवारी (दि. ७) दुपारी १.३० वाजेपर्यंत सेंटियागो बर्नाब्यू स्टेडियमच्या प्रेसिडेन्शिल बॉक्समध्ये झाला.’ मिळालेल्या माहितीनुसार पोर्तुगालचा स्टार खेळाडू रोनाल्डो आपला करार ३० जून २०२१ पर्यंत वाढविणार आहे.
गॅरेथ बेल, लुका मोड्रिक आणि टॉनी क्रुझ या दिग्गजांच्या पावलावर पाऊल ठेवताना ३१ वर्षांच्या रोनाल्डोने आपल्या क्लबसह करार वाढविण्यास सहमती दर्शविली. या दरम्यानच, फिफाच्या एक वर्षाच्या स्थानांतरण प्रतिबंधच्या सुरुवातीपासून झुंजण्याची तयारीही क्लबने केली आहे. (वृत्तसंस्था)
रोनाल्डो आधी इंग्लिश फुटबॉल क्लब मँचेस्टर युनायटेड (एमयू) क्लबसाठी खेळत होता.
२००९ साली त्याने एमयू संघाला गुडबाय करीत रेयाल माद्रिदमध्ये एंट्री मारली.
तेव्हापासून रोनाल्डोने रेयाल माद्रिदसाठी एकूण ३७१ गोल केले आहेत.
रेयाल माद्रिदसह केलेल्या सात वर्षांच्या प्रवासात रोनाल्डोने क्लबला दोन वेळा चॅम्पियन्स लीग आणि एकदा स्पॅनिश लीग विजेतेपद जिंकून दिले.