रॉबिन उथप्पाने केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी

By admin | Published: April 27, 2017 06:17 AM2017-04-27T06:17:16+5:302017-04-27T06:17:16+5:30

कोलकाता नाइट रायडर्स संघाचा यष्टिरक्षक-फलंदाज रॉबिन उथप्पाने महेंद्रसिंग धोनीच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.

Robin Uthappa is equal to Dhoni's record | रॉबिन उथप्पाने केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी

रॉबिन उथप्पाने केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी

Next
>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 27 - कोलकाता नाइट रायडर्स संघाचा यष्टिरक्षक-फलंदाज रॉबिन उथप्पाने महेंद्रसिंग धोनीच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. पुण्याच्या गहुंजे मैदानात बुधवारी झालेल्या सामन्यात त्याने रायझिंग पुणे सुपरजायंट्सच्या संघातील 3 खेळाडूंना यष्टिचीत केलं. यासोबतच त्याने आयपीएलमध्ये एकाच सामन्यात तीन फलंदाजांना यष्टिचीत करण्याच्या धोनीच्या विक्रमाशी बरोबरी केली. उथप्पाने पुण्याच्या अजिंक्य रहाणे, महेंद्रसिंग धोनी आणि मनोज तिवारी या खेळाडूंना यष्टिचीत केलं. यापुर्वी महेंद्रसिंग धोनीनं दोनदा अशी कामगिरी बजावली आहे.  
या सामन्यात उथप्पाच्या (47 चेंडूंत 7 चौकार आणि 6 षटकार ठोकत त्याने 87 धावा)  खेळीच्या बळावर  कोलकाताने पुण्याचा 7 गडी अणि 11 चेंडू शिल्लक ठेवत पराभव केला. त्यासाठी त्याने सामनावीरचा मान मिळवला. त्याने अवघ्या 26 चेंडूंत आपले अर्धशतक झळकावले होते. 
रायझिंग सुपरजायंट पुण्याने दिलेल्या १८२ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या सुनील नरेन व कर्णधार गौतम गंभीर यांनी सुरुवातीपासूनच आक्रमक पावित्रा घेतला. बिग बॅशमध्ये सलामीला येत यश संपादन केलेल्या वेस्ट इंडिजचा गोलंदाज नरेन याने नेहमीप्रमाणे आक्रमक फटकेबाजी केली. मात्र, बुधवारी त्याला म्हणावे तसे यश मिळाले नाही. त्याने तीन चौकारांच्या साह्याने ११ चेंडूत १६ धावा केल्या. चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात ठाकूरच्या थेट फेकीवर तो धावबाद झाला.
त्यानंतर फलंदाजीस आलेल्या रॉबिन उथप्पा यानेही आक्रमक फलंदाजीसच सुरुवात केली. इम्रान ताहीरच्या गोलंदाजीवर त्याचा सोपा झेल जयदेव उनाडकट याच्याकडून सुटला. यावेळी तो अवघ्या १२ धावांवर खेळत होता. त्यानंतर मात्र, त्याने पुण्याच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतला. त्याने अवघ्या २६ धावांत आपले अर्धशतक झळकावले. उथप्पाने मैदानाच्या चारही बाजूला नेत्रदीपक फटके मारले. दुसऱ्या बाजूने 
कर्णधार गौतम गंभीरने सावध फलंदाजी करीत उथप्पाला साथ दिली. त्यानेही ३५ चेंडूत पाच चौकार व एका षटकाराच्या साह्याने अर्धशतक झळकावले. उथप्पाने ४६ चेंडूंत सहा षटकार व सात चौकारांच्या साह्याने ८७ धावा केल्या. जिंकण्यासाठी अवघ्या पाच धावा आवश्यक असताना उनाडकटच्या चेंडूवर तो बाद झाला. त्यांनतर लगेचच ख्रिस्तियनच्या चेंडूवर गंभीर झेलबाद झाला. गंभीरने ४६ चेंडूत एक षटकार व सहा चौकारांच्या साह्याने ६२ धावा केल्या. त्यांनतर आलेल्या ब्राव्हो व मनीष पांडे यांनी विजयाची औपचारिकता पूर्ण केली.
 
धावफलक -
रायझिंग पुणे सुपरजायंट : अजिंक्य रहाणे यष्टीचित उथप्पा गो. नरेन ४६, राहुल त्रिपाठी त्रिफळा गो. चावला ३८, स्टीव्ह स्मिथ नाबाद ५१, महेंद्रसिंग धोनी यष्टीचित उथप्पा गो. कुलदीप यादव २३, मनोज तिवारी यष्टीचित उथप्पा गो. कुलदीप यादव १, डॅनियल ख्रिस्तीयन झे. पांडे गो. यादव १६ ; अवांतर ७ एकूण २० षटकांत ५ बाद १८२; गोलंदाजी : उमेश यादव ३-०-२८-१, क्रिस वोक्स् ३-०-३८-०, सुनील नरेन ४-०-३४-१, ग्रँडोम २-०-१४-०, पीयूष चावला ४-०-३६-२, कुलदीप यादव ४-०-३१-२ 
कोलकाता नाईट रायडर्स : सुनील नरेन धावचित (ठाकूर/धोनी) १६, गौतम गंभीर झे. ठाकूर गो. ख्रिस्तीयन ६२, रॉबिन उथप्पा झे. त्रिपाठी गो. उनाडकट ८७, डॅरेन ब्राव्हो नाबाद ६, मनीष पांडे नाबाद ०; अवांतर १३ एकूण १८.१ षटकांत ३ बाद १८४; गोलंदाजी : जयदेव उनाडकट ३-०-२६-१, शार्दुल ठाकूर ३.१-०-३१-०, वॉशिंग्टन सुंदर ३-०-३२-०, डॅनियल ख्रिस्तीयन ४-०-३१-१, इम्रान ताहीर ४-०-४८-०, राहुल त्रिपाठी १-०-१२-१.
 

Web Title: Robin Uthappa is equal to Dhoni's record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.