टेनिस कोर्टवर पाण्याची बाटली शोधतच राहीला फेडरर; अखेर 'या' व्यक्तीने दिला मदतीचा हात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2019 04:50 PM2019-08-27T16:50:19+5:302019-08-27T16:51:08+5:30
फेडररने आपल्या रॅकेटनेही पाण्याची बाटणी खेळण्याचा प्रयत्न केला. पण त्याला ही बाटली काही मिळवता आली नाही.
अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा : भारताच्या 22 वर्षीय सुमित नागलने मंगळवारी अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत इतिहास घडवला. रॉजर फेडररसारखा दिग्गज प्रतिस्पर्धी समोर असतानाही सुमितनं मोठ्या धाडसानं खेळ केला आणि जगाला आपली दखल घेण्यास भाग पाडले. पाच वेळा अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकणाऱ्या फेडररने हा सामना 4-6, 6-1, 6-2, 6-4 असा जिंकला खरा, परंतु सुमितनं पहिला सेट जिंकून धमाकाच केला. पण या सामन्यात फेडररची पाण्याची बाटली हरवल्याचे पाहायला मिळाले. यावेळी फेडरर ही बाटली मिळवण्यासाठी भरपूर धडपड केली. पण फेडररला ही बाटली सापडलीच नाही.
आजचा फेडरर आणि सुमित यांचा सामना चांगलाच गाजला. सुमितने पहिला सेट जिंकत सर्वांनाच आपली दखल घ्यायला भाग पाडले. पण दोन सेट्स झाल्यावर खेळाडू थोडी विश्रांती घेण्यासाठी जातात. त्यावेळी पाणी किंवा एनर्जी ड्रिंक्स पित असतात. फेडररही असाच पाणी पिण्यासाठी आपल्या बेंचवर बसला होता. त्यावेळी त्याने दोन एनर्जी ड्रिंक्सच्या बाटल्या काढल्या आणि खाली ठेवल्या. या बाटल्या ठेवत असताना त्याच्या बेंचखाली एक पाण्याची बाटली होती. ती घरंगळच बेंचच्या मागे गेली. त्यावेळी फेडररने आपल्या रॅकेटनेही पाण्याची बाटणी खेळण्याचा प्रयत्न केला. पण त्याला ही बाटली काही मिळवता आली नाही. त्यावेळी तिथे उभ्या असलेल्या बॉल बॉयने ही गोष्ट पाहिली आणि त्याने ही बाटली उचलून फेडररच्या हातामध्ये दिली.
पाहा हा खास व्हिडीओ
Water bottle problems...
— US Open Tennis (@usopen) August 27, 2019
💦🎾💦#USOpenpic.twitter.com/QjLiqOQYUy
कोण आहे सुमित नागल
16 ऑगस्ट 1997 साली हरयाणाच्या जझ्झर येथे जन्मलेल्या सुमितने 2015मध्ये विम्बल्डन स्पर्धेतील मुलांच्या दुहेरी गटाचे जेतेपद पटकावले होते. त्याने व्हिएतनामच्या ली होआंग नामसोबत ही कामगिरी केली होती. कनिष्ठ गटाचे ग्रँड स्लॅम नावावर करणारा सुमित हा सहावा भारतीय खेळाडू ठरला. 2016मध्ये त्याने भारताच्या डेव्हिच चषक संघात पदार्पण केले. नवी दिल्ली येथे झालेल्या वर्ल्ड ग्रुप प्ले ऑफ फेरीत तो स्पेनविरुद्ध खेळला होत. सुमितने या वर्षात मोठी भरारी घेतली. वर्षाच्या सुरुवातीला जागतिक क्रमवारीत 361वरून त्यानं 190व्या स्थानापर्यंत झेप घेतली. त्याने सलग सात स्पर्धांच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.
2008मध्ये भारताच्या ग्रँड स्लॅम स्पर्धेसाठी निवडलेल्या 14 खेळाडूंमध्ये सुमितचा समावेश होता. महेश भुपती आणि कॅनडाचे प्रशिक्षक बॉबी महाल यांनी सुमितला हेरले. सुमितच्या या यशाचे श्रेय त्याचे वडील भुपतीला देतात. 2011मध्ये भुपतीच्या मार्गदर्शनाखाली सुमितने सरावाला सुरुवात केली आणि त्यानंतर तो कॅनडात गेला. तीन वर्ष कॅनडामध्ये राहिल्यानंतर 2014मध्ये सुमित जर्मनीला गेला आणि तेथे अर्जेंटिनाचे प्रशिक्षक मारिआनो डेल्फीनो यांच्या मार्गदर्शनाखाली त्यानं सरावाला सुरुवात केली.