रॉजर फेडरर, वावरिंका जेतेपदासाठी भिडणार
By Admin | Published: March 20, 2017 12:10 AM2017-03-20T00:10:29+5:302017-03-20T00:10:29+5:30
स्वित्झर्लंडचा लिजंड टेनिसपटू रॉजर फेडररने एटीपी इंडियन वेल्स स्पर्धेची अंतिम फेरी गाठताना अमेरिकेच्या जॅक सॉकला सरळ
इंडियन वेल्स : स्वित्झर्लंडचा लिजंड टेनिसपटू रॉजर फेडररने एटीपी इंडियन वेल्स स्पर्धेची अंतिम फेरी गाठताना अमेरिकेच्या जॅक सॉकला सरळ दोन सेटमध्ये नमवले. विशेष म्हणजे, याआधी झालेल्या उपांत्य सामन्यात प्रतिस्पर्धी आॅस्टे्रलियाच्या निक किर्गिओसने घेतलेल्या माघारीमुळे फेडररने सामना न खेळताच उपांत्य फेरी गाठली होती. त्याचवेळी, स्पर्धेच्या विजेतेपदासाठी फेडररला आपला देशबांधव स्टेन वावरिंकाविरुध्द दोन हात करावे लागतील.
या स्पर्धेचे चार वेळा विजेतेपद पटकावलेल्या फेडररने दहाव्यांदा उपांत्य फेरी खेळली. त्याआधी त्याने उपांत्यपुर्व फेरीचा सामना न खेळताच आगेकूच केली होती. अन्नातून विषबाधा झाल्याने किर्गिओसने सामन्यातून माघार घेण्याचा निर्णय घेतल्याने फेडररचा उपांत्य फेरी प्रवेश सुकर झाला. उपांत्य सामन्यात फेडररने आपला धडाका कायम राखताना जॅक सॉकचा ६-१, ७-६(४) असा पाडाव केला. पहिला सेट सहजपणे जिंकलेल्या फेडररला दुसऱ्या सेटमध्ये जॅकने चांगलेच झुंजवले. हा सेट टायब्रेकमध्ये गेल्यानंतर मात्र, फेडररने आपला दर्जा दाखवताना जॅकला कोणतीही संधी न देता दिमाखत अंतिम फेरी गाठली. दुसरीकडे फेडररचा देशबांधव वावरिंकाने देखील सहजपणे अंतिम फेरीत प्रवेश करताना स्पेनच्या पाब्लो कॅरिनो बुस्ताचा ६-३, ६-२ असा धुव्वा उडवला. वावरिंकाच्या आक्रमक धडाक्यापुढे पाब्लोचा अखेरपर्यंत निभाव लागला नाही. तसेच, वावरिंकाने कारकिर्दीत पहिल्यांदाच या सामन्याच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. याआधी उपांत्यपुर्व फेरीत वावरिंकाने आॅस्ट्रियाच्या डॉमनिक थिएमचा तीन सेटपर्यंतच्या अटीतटीच्या सामन्यात ६-४, ४-६, ७-६ असा पाडाव केला होता. (वृत्तसंस्था)