रॉजर फेडररचे ‘ग्रँड’ त्रिशतक!
By admin | Published: January 23, 2016 03:54 AM2016-01-23T03:54:44+5:302016-01-23T03:54:44+5:30
जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या स्वीत्झर्लंडच्या रॉजर फेडरर याने आॅस्ट्रेलियन ओपनमध्ये बल्गेरियाच्या ग्रिगोर दिमित्रोव्हला धूळ चारून आपला
मेलबोर्न : जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या स्वीत्झर्लंडच्या रॉजर फेडरर याने आॅस्ट्रेलियन ओपनमध्ये बल्गेरियाच्या ग्रिगोर दिमित्रोव्हला धूळ चारून आपला ३०० वा ग्रँडस्लॅम सामना जिंकला. महिला गटात अव्वल टेनिसपटू अमेरिकेची सेरेना विल्यम्स, रशियाच्या मारिया शारापोव्हा यांनी विजयी धडाका कायम राखताना चौथी फेरी गाठली.
फ्रान्सच्या विल्फ्रेड त्सोंगा याने अनुभवाच्या बळावर आपल्याच देशाच्या पियरे जू हर्बर्टवर ६-४, ७-६, ७-६ अशा फरकाने मात करताना अंतिम १६ खेळाडूंत प्रवेश केला, तर १५ वे मानांकन प्राप्त बेल्जियमच्या डेव्हिड गॉफिन याने आॅस्ट्रियाच्या डॉमिनिक थिएमचा ६-१, ३-६, ७-६, ७-५ असा पराभव करताना स्पर्धेच्या चौथ्या फेरीत प्रवेश मिळविला. चौथ्या फेरीच्या लढतीत गॉफिनसमोर अनुभवी रॉजर फेडररचे आव्हान असेल.
महिला गटातील एकेरी लढतीत जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या सेरेना विल्यम्सने रशियाच्या १८ वर्षीय डारिया कसात्किनावर ६-१, ६-१ अशी सहज मात करीत चौथ्या फेरीत प्रवेश केला. सेरेना हिने या लढतीत २४ विनर्स लगावले. अवघ्या ४४ मिनिटांत तिने हा सामना आपल्या नावे केला. गतविजेत्या रशियाच्या मारिया शारापोव्हा हिने तीन सेटपर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या लढतीत अमेरिकेच्या लॉरेन डेव्हिसवर ६-१, ६-७, ६-० अशी सरशी साधून पुढची फेरी गाठली. (वृत्तसंस्था)
जोको एक्स्प्रेसचा विजयी धडाका
जागतिक क्रमवारीतील अव्वल टेनिसपटू सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने लौकिकास साजेसा खेळ करताना आॅस्ट्रेलियन ओपनच्या चौथ्या फेरीत जागा मिळविली. या स्टार खेळाडूने तिसऱ्या फेरीत पुरुष गटातील एकेरी लढतीत इटलीच्या आंद्रियास सेपीला ६-१, ७-५, ७-६ अशा फरकाने पराभूत करताना अंतिम १६ खेळाडूंत जागा निश्चित केली. विशेष म्हणजे सेपीविरुद्ध जोकोविचचा हा सलग ३३ वा विजय ठरला.
तरीही निशिकोरी जिंकला
पुरुष गटात स्पेनच्या गुईलेर्मो गार्सिया लोपेजविरुद्धच्या लढतीत जपानच्या केई निशिकोरीच्या हाताला दुखापत झाली होती. मात्र त्याने हार न मानता हातावर उपचार घेत सामना खेळला. विशेष म्हणजे या लढतीत निशिकोरीने ७-५, २-६, ६-३, ६-४ अशा फरकाने पराभव करीत पुढच्या फेरीत प्रवेश केला.
बोपन्ना तिसऱ्या फेरीत, भूपती पराभूत
भारताचा अनुभवी खेळाडू रोहन बोपन्ना आणि रोमानियाच्या फ्लोरिन मर्जिया यांनी आॅस्ट्रेलियन ओपनच्या दुहेरीत विजयी अभियान कायम राखताना तिसरी फेरी गाठली; मात्र भारताच्या महेश भूपतीला आपल्या जोडीदारासह पराभवाचा सामना करावा लागला.
पुरुष गटातील दुहेरीत बोपन्ना आणि मर्जिया या जोडीने झेक प्रजासत्ताकच्या लुकास डलूही आणि जिरी वेस्ली यांच्यावर सरळसेटमध्ये ६-३, ६-२ ने विजय मिळवून
उप उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला; मात्र अन्य लढतीत भारताचा महेश भूपती आणि लॅग्झम्बर्गचा जाईल्स म्युलर यांना अमेरिकेच्या बॉब आणि माईक ब्रायनकडून ३-६, २-६ असा पराभव स्वीकारावा लागला.
दरम्यान, भारताचा लिएंडर पेस आणि मार्टिना हिंगीस यांचा अनास्तासिया पावलियुचेनकोव्हा आणि डोमिनिक इंग्लोट या रशियन खेळाडूंविरुद्धचा मिश्र दुहेरीचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला.