रॉजर फेडररची विक्रमी कामगिरीसह आगेकूच, कारकिर्दीत मिळवला १२५०वा विजय
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2021 09:14 AM2021-07-05T09:14:37+5:302021-07-05T09:15:01+5:30
फेडरर विक्रमी सलग २२व्यांदा विम्बल्डनमध्ये खेळत असून या स्पर्धेत त्याने १०४ विजयही पूर्ण केले. त्याचप्रमाणे, त्याने १८व्यांदा विम्बल्डन स्पर्धेच्या चौथ्या फेरीत धडक मारली आहे.
विम्बल्डन : जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या दिग्गज रॉजर फेडररने विम्बल्डन ग्रँडस्लॅम स्पर्धेची चौथी फेरी गाठताना ग्रेट ब्रिटनच्या कॅमरुन नोरीला चार सेटमध्ये नमवले. नोरीने फेडररला चांगली लढत दिली, मात्र फेडररने सामन्यावरील पकड कायम ठेवताना ६-४, ६-४, ५-७, ६४ अशी बाजी मारली. फेडररने यासह आपल्या कारकिर्दीत १२५० सामने जिंकण्याचा पराक्रम केला. (Roger Federer's record-breaking performance, the 1250th victory of his career)
फेडरर विक्रमी सलग २२व्यांदा विम्बल्डनमध्ये खेळत असून या स्पर्धेत त्याने १०४ विजयही पूर्ण केले. त्याचप्रमाणे, त्याने १८व्यांदा विम्बल्डन स्पर्धेच्या चौथ्या फेरीत धडक मारली आहे. याआधी फ्रेंच ओपन स्पर्धेत चांगली सुरुवात करत चौथी फेरी गाठल्यानंतर तंदुरुस्तीकडे अधिक लक्ष देत माघार घेण्याचा निर्णय फेडररने घेतला होता. त्यामुळे त्याच्या कामगिरीवर शंका निर्माण झाली होती. मात्र, आपल्या आवडत्या विम्बल्डन स्पर्धेत त्याने तुफानी खेळ करत टीकाकारांना गप्प केले. याआधी तिसऱ्या फेरीत फेडररने रिचर्ड गास्केटचा सरळ तीन सेटमध्ये पराभव केला होता.