रोहन बोपन्ना उपांत्य फेरीत; २०१५ नंतर पहिल्यांदाच ग्रँडस्लॅमच्या अव्वल चारमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2022 08:49 AM2022-06-01T08:49:53+5:302022-06-01T08:50:03+5:30
बोपन्ना-मिडेलकूप यांनी झुंजार खेळाचे प्रदर्शन करताना लॉयड ग्लासपूल-हेन्री हेलियोवारा यांचा ४-६, ६-४, ७-६ असा पराभव केला.
पॅरिस : भारताचा अनुभवी टेनिसपटू रोहन बोपन्ना याने आपला डच जोडीदार एम. मिडेलकूप याच्यासह शानदार कामगिरी करताना फ्रेंच ओपन पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली. दखल घेण्याची बाब म्हणजे गेल्या ७ वर्षांमध्ये बोपन्ना पहिल्यांदाच एखाद्या ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचला आहे. याआधी त्याने २०१५ मध्ये विम्बल्डनची उपांत्य फेरी गाठली होती.
बोपन्ना-मिडेलकूप यांनी झुंजार खेळाचे प्रदर्शन करताना लॉयड ग्लासपूल-हेन्री हेलियोवारा यांचा ४-६, ६-४, ७-६ असा पराभव केला. पहिला सेट गमावल्यानंतर पिछाडीवर पडलेल्या बोपन्ना-मिडेलकूप यांनी जबरदस्त पुनरागमन करत सलग दोन सेट जिंकले. याआधी, बोपन्नाने २०१५ मध्ये रोमानियाच्या फ्लोरिन मर्जियासह खेळताना विम्बल्डनची उपांत्य फेरी गाठली होती. बोपन्ना-मिडेलकूप आता १२व्या मानांकित मार्शेलो अरेवालो-जीन ज्युलियन रॉजर यांच्याविरुद्ध खेळतील.
बोपन्ना-मिडेलकूप यांची लक्षवेधी आगेकूच
जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या बोपन्ना-मिडेलकूप यांनी आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर सर्वांना प्रभावित केले. स्पर्धेत आतापर्यंत त्यांची जोडी जायंट किलर ठरली. उप-उपांत्यपूर्वे फेरीआधी बोपन्ना-मिडेलकूप यांनी निकोला मेकटिक-मेट पेविक या क्रोएशियाच्या दुसऱ्या मानांकित जोडीचा ६-७ (५-७), ७-६ (७-३), ७-६ (१२-१०) असा झुंजार पराभव केला होता.