Asian Games 2018: भारताचा 'सोनेरी' षटकार; टेनिस पुरुष दुहेरीत सुवर्णस्वप्न साकार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 12:05 PM2018-08-24T12:05:14+5:302018-08-24T12:30:27+5:30
Asian Games 2018: इंडोनेशियात सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सहाव्या दिवशी भारताच्या खात्यात सहावं सुवर्णपदक जमा झालं आहे.
जकार्ता - इंडोनेशियात सुरू असलेल्या आशियाई स्पर्धेत सहाव्या दिवशी भारताच्या खात्यात सहावं सुवर्णपदक जमा झालं आहे. टेनिस पुरुष दुहेरीत भारताच्या रोहन बोपण्णा- दिविज शरण जोडीनं कझाकिस्तानच्या जोडीवर ६-३, ६-४ अशी सरळ सेटमध्ये मात करून सुवर्णपदकावर नाव कोरलं.
पुण्यात टेनिसचे धडे गिरवणाऱ्या अंकिता रैनानं गुरुवारी टेनिस महिला एकेरीत कांस्य पदक जिंकलं होतं. त्यामुळे भारतीयांच्या नजरा बोपण्णा-शरण जोडीवर खिळल्या होत्या. सुवर्णपदकाचे प्रबळ दावेदार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं. आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करत त्यांनी हे सोनेरी स्वप्न साकार करून दाखवलं. कझाकिस्तानच्या एलेक्झांडर बुबलिक आणि डेनिस येअसेयेव या जोडीला डोकंही वर काढण्याची संधी न देता बोपण्णा-शरण जोडगोळीनं ५२ मिनिटांत सुवर्ण कामगिरी केली.
उपांत्य फेरीत रोहन बोपण्णा-दिविज शरण यांना विजयासाठी संघर्ष करावा लागला होता. जपानच्या जोडीविरुद्धचा हा सामना भारतीय वीरांनी शेवटच्या सेटमध्ये १०-८ असा जिंकला होता.
Indeed, a Gold-lined morning for #TeamIndia!@rohanbopanna and @divijsharan played a solid Men's Doubles Finals to give India its 6th gold medal of the #AsianGames2018, with a 6-3, 6-4 straight sets win over Kazakh pair of #BublikA and #DenisY! #Congratulations 🎾🇮🇳👏 pic.twitter.com/SUPasHLPvM
— Team India (@ioaindia) August 24, 2018