रोहन-जीवन ‘चेन्नई’त एक्स्प्रेस
By admin | Published: January 9, 2017 04:12 AM2017-01-09T04:12:59+5:302017-01-09T04:12:59+5:30
चेन्नई ओपनच्या एकेरी विभागात जरी भारताचे आव्हान लवकर संपुष्टात आले असले, तरी पुरुष दुहेरीमध्ये मात्र भारतीयांचेच वर्चस्व राहिले.
चेन्नई : चेन्नई ओपनच्या एकेरी विभागात जरी भारताचे आव्हान लवकर संपुष्टात आले असले, तरी पुरुष दुहेरीमध्ये मात्र भारतीयांचेच वर्चस्व राहिले. भारतीय खेळाडूंमध्येच झालेल्या अंतिम सामन्यात स्टार खेळाडू रोहन बोपन्नाने जीवन नेदुनचेझियानसह खेळताना दिविज शरण-पुरव राजा यांना नमवून जेतेपदाला गवसणी घातली.
बोपन्ना - जीवन यांनी स्पर्धेत सातत्यपुर्ण कामगिरीसह चमकदार आगेकूच करणाऱ्या दिविज - राजा यांचा केवळ ६५ मिनिटांंमध्ये ६-३, ६-४ असा पराभव केला. विशेष म्हणजे बोपन्ना - जीवन यांनी मिळून जिंकलेले हे पहिले विजेतेपद ठरले. त्याचवेळी त्यांनी दिविज - राजा यांना तिसरे जेतेपदापासून दूर ठेवले.
स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केलेल्या दिविज - राजा यांना अंतिम फेरीत आपल्या लौकिकानुसार कामगिरी करण्यात अपयश आले. अंतिम सामन्यात वयाने सर्वात लहान असलेल्या जीवनने अनुभवी बोपन्नासह लक्षवेधी खेळ केला. या सामन्यात आपली सर्विस एकदाही न गमावणारा तो एकमेवळ खेळाडू राहिला हे विशेष. त्याने आपल्या वेगवान व अचूक सर्विसच्या जोरावर जेतेपद जिंकण्यात मोलाचे योगदान दिले. दुसरीकडे, दिविज - राजा यांच्याकडून सर्विस करताना अनेक चुका झाल्या. यामुळे त्यांनी अनेक गुण बोपन्ना - जीवन यांना अक्षरश: बहाल केले. याजोरावर बोपन्ना - जीवन यांनी वर्चस्व मिळवताना दिविज - राजा जोडीवर कमालीचे दडपण टाकून त्यांना आणखी चुका करण्यास भाग पाडले. (वृत्तसंस्था)
भारतीय टेनिससाठी हे खूप मोठे पाऊल ठरले. कदाचित एका तरी लहान मुलाला टेनिस रॅकेट हाती घेण्यास हे जेतेपद प्रेरीत करेल. हा विजय भारतीय टेनिससाठी मोठा विजय आहे. जीवनला अधिकाधिक सहजपणे खेळता येईल यावर माझा भर होता. त्याच्याहून अनुभवी असलेले दिविज व राजा यांच्यावरील दडपण दिसत होते. या सामन्यात दोन्ही संघांना संधी मिळाल्या, परंतु आम्ही त्या संधी साधण्यात यशस्वी ठरलो.
- रोहन बोपन्ना
बोपन्नाचे हे कारकिर्दीतील १५ वे जेतेपद असून जून २०१५ नंतरचे त्याचे हे पहिलेच विजेतेपद ठरले.
याआधी बोपन्नाने फ्लोरिन मर्जियासह खेळताना स्टुटगार्ड ओपनचे विजेतेपद पटकावले होते.
यानंतर बोपन्नाला सिडनी आणि माद्रिद स्पर्धांमध्ये पराभवास सामोरे जावे लागले होते.
एटीपी वर्ल्ड टूर स्तरावर जीवनचे हे पहिलेच विजेतेपद ठरले.
चॅलेंजर सर्किटमध्ये जीवनने एकूण ३ दुहेरी विजेतेपद पटकावली आहेत.
२०११ साली लिएंडर पेस - महेश भूपती या स्टार जोडीने येथे बाजी मारल्यानंतर पहिल्यांदाच भारतीय जोडीने दुहेरीचे विजेतेपद उंचावले आहे. पेस - भूपती यांनी चेन्नई ओपनमध्ये तब्बल पाच विजेतेपद जिंकली आहेत.