‘बॉक्सिंग डे’ कसोटीतून रोहितला डच्चू ?
By admin | Published: December 25, 2014 01:53 AM2014-12-25T01:53:24+5:302014-12-25T01:53:24+5:30
शुक्रवारपासून सुरू होणा-या बॉक्सिंग डे कसोटीसाठी भारतीय संघाच्या मधल्या फळीत काही बदल अपेक्षित असून, आऊट आॅफ फॉर्म
मेलबर्न : शुक्रवारपासून सुरू होणा-या बॉक्सिंग डे कसोटीसाठी भारतीय संघाच्या मधल्या फळीत काही बदल अपेक्षित असून, आऊट आॅफ फॉर्म असलेल्या रोहित शर्माला डच्चू मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्याजागी सुरेश रैनाला संघात पुन्हा स्थान मिळू शकते. गेल्या दोन कसोट्यांतील कामगिरी पाहता रोहितला साजेसा खेळ करता आलेला नाही. त्याला गेल्या दोन कसोट्यांत केवळ ८१ धावाच करता आल्या आहेत. बुधवारी रैनाने अजिंक्य रहाणे आणि आऱ अश्विन यांच्यासोबत सराव केला. त्यानंतर मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, शिखर धवन आणि विराट कोहली यांनी मोर्चा सांभाळला.
भारतीय संघानेही ‘बॉक्सिंग डे’ कसोटीसाठी दोन दिवस कसून सराव केला. २०१२-१३ साली मायदेशात भारताने ४-० असा विजय मिळवून बॉर्डर गावसकर चषकावर कब्जा केला होता. हा चषक आपल्याकडे राखण्यासाठी भारताला उर्वरित दोन्ही कसोटी जिंकणे महत्त्वाचे आहे. म्हणून भारतीय संघ मधल्या फळीत काही बदल करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. धवन आणि कोहलीही सरावात एकमेकांशी चर्चा करताना दिसले. त्यामुळे ड्रेसिंग रूममध्ये झालेल्या त्यांच्यातील कथित वादाला पूर्णविराम मिळाला आहे. रोहितने सर्वात शेवटी वृद्धिमान सहासह सराव केला. या दरम्यान भुवनेश्वर कुमारने अधिक काळ गोलंदाजी करणे टाळले.(वृत्तसंस्था)