रोहित सलामीसाठी सज्ज

By admin | Published: May 30, 2017 01:10 AM2017-05-30T01:10:49+5:302017-05-30T01:10:49+5:30

रोहित शर्मा सलामीवीर म्हणून पुनरागमन करण्यास सज्ज झाला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या सलामीच्या लढतीपूर्वी

Rohit is ready for the opening | रोहित सलामीसाठी सज्ज

रोहित सलामीसाठी सज्ज

Next

लंडन : रोहित शर्मा सलामीवीर म्हणून पुनरागमन करण्यास सज्ज झाला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या सलामीच्या लढतीपूर्वी भारतीय संघ आज (मंगळवारी) बांगलादेशविरुद्ध अखेरचा सराव सामना खेळणार आहे. या लढतीच्यानिमित्ताने रोहितला सलामीवीर म्हणून सराव करण्याची चांगली संधी मिळणार आहे.
पावसाच्या व्यत्ययामुळे गाजलेल्या पहिल्या सराव सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध ४५ धावांनी विजय मिळवल्यानंतर कोहली मंगळवारच्या लढतीत फलंदाजांना सरावासाठी अधिक संधी मिळावी, यासाठी प्रयत्नशील आहे. पहिल्या लढतीत भारताला केवळ २६ षटके फलंदाजी करण्याची संधी मिळाली.
रोहितने इंडियन प्रीमिअर लीगमध्ये संघहितासाठी खालच्या क्रमांकावर फलंदाजी केली होती, पण आता तो डावाची सुरुवात करणार आहे. वैयक्तिक कारणास्तव तो पहिल्या सराव सामन्यात खेळू शकला नव्हता. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने २०१३ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत जेतेपदाचा मान मिळवला होता. त्या वेळी धोनीने रोहितला सलामीला पाठविण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर रोहितच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेट कारकिर्दीला नवे वळण मिळाले.
२०१३ च्या यशामध्ये रोहित व शिखर धवन या सलामी जोडीची भूमिका महत्त्वाची ठरली होती. या वेळी चार वर्षांनंतर पुन्हा एकदा त्याच वातावरणात ही सलामीची जोडी चमकदार कामगिरी करण्यास उत्सुक आहे. पहिल्या सराव सामन्यात सलामीवीर म्हणून अजिंक्य रहाणे अपयशी ठरला. कोहलीने या लढतीत अर्धशतकी खेळी केली. कोहली महेंद्रसिंह धोनीसह पुन्हा एकदा चमकदार खेळी करण्यास उत्सुक आहे. धोनीने आपल्या खेळीदरम्यान प्रभावित केले. युवराज व्हायरल फिव्हरमधून सावरला किंवा नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे बांगलादेशविरुद्धच्या सराव सामन्यात त्याच्या सहभागाबाबत अद्याप निश्चित झालेले नाही. या अनुभवी फलंदाजाला पाकिस्तानविरुद्धच्या लढतीपूर्वी फलंदाजीचा सराव मिळण्याची गरज आहे. कर्णधार कोहली केदार जाधवलाही संधी देण्यास उत्सुक आहे.
५० षटकांच्या क्रिकेटमध्ये बांगलादेश संघाची कामगिरी उल्लेखनीय आहे. आॅस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये २०१५ ला आयोजित विश्वकप क्रिकेट स्पर्धेत बांगलादेशने उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. मुस्तफिजूर रहमान, रुबेल हुसेन, तस्किन अहमद व कर्णधार मशरफी मूर्तजा हे गोलंदाज कुठल्याही संघाविरुद्ध धोकादायक ठरू शकतात. भारताने २०१५ मध्ये बांगलादेशविरुद्ध वन-डे मालिका गमावली होती. त्या वेळी मुस्तफिजूर रहमान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवखा होता. बांगलादेशविरुद्धच्या सराव सामन्यामुळे रविवारी पाकविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सामन्यापूर्वी संघाला चांगली तयारी करण्याची संधी मिळणार आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या सराव सामन्यात भारताचे गोलंदाज आक्रमक व भेदक दिसले. भारताने प्रतिस्पर्धी संघाचा डाव १८९ धावांत गुंडाळला. कोहलीकडे नव्या चेंडूने मारा करण्यासाठी भुवनेश्वर कुमार, उमेश यादव व महंमद शमी हे पर्याय उपलब्ध आहेत. डेथ ओव्हर्सची जबाबदारी यॉर्कर स्पेशालिस्ट जसप्रीत बुमराहवर राहील. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये आश्विनच्या तुलनेत अष्टपैलू रवींद्र जडेजा सरस आहे. दुसऱ्या सराव सामन्यानंतर पाकविरुद्धच्या लढतीसाठी भारतीय संघातील अंतिम ११ खेळाडू कोण असतील, याची कल्पना येईल. (वृत्तसंस्था)

प्रतिस्पर्धी संघ

भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, युवराज सिंग, महेंद्रसिंह धोनी (यष्टिरक्षक), केदार जाधव, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, महंमद शमी, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, रविचंद्रन आश्विन, उमेश यादव, दिनेश कार्तिक, अजिंक्य रहाणे.
बांगालदेश : तमिम इक्बाल, इमरुल कायेस, सौम्या सरकार, शब्बीर रहमान, महमुदुल्लाह रियाद, शाकिब-अल-हसन, मुशफिकर रहीम, मशरफी मूर्तजा, रुबेल हुसेन, मुस्तफिजूर रहमान, तस्किन अहमद, मेहदी हसन, मोसादेक हुसेन, सुनजामुल इस्लाम, शफीउल इस्लाम.

सामन्याची वेळ : दुपारी ३.०० पासून (भारतीय प्रमाणवेळेनुसार)

Web Title: Rohit is ready for the opening

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.